नाशिकमधील गुंडगिरीविरुद्ध सुरू झालेली मोहीम ठाण्यातही राबवावी, संजय राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

नाशिकमध्ये कोणचाही मुलाहिजा न ठेवता गुंडगिरी मोडून काढण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना दिले असून तसेच आदेश ठाणे जिल्ह्यातील गुंडगिरीविरुद्ध देणे गरजेचे आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. ठाण्यातील गुंडगिरी, भ्रष्टाचार, अन्यायाविरुद्ध शिवसेना आणि मनसेचा सोमवारी संयुक्त मोर्चा निघणार आहे. याच संदर्भात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला राऊत उत्तर देत होते.

सोमवारी सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ठाण्यात आज महानगरपालिकेवर शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा मोर्चा निघतोय. मोर्चाचे कारण स्पष्ट आहे. मुख्यमंत्री, पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात, महानगरपालिका हद्दीत जी गुंडगिरी, दरोडेखोरी, भ्रष्टाचार, लाचलुचपत सुरू आहे त्या विरोधात हा मोर्चा आहे.

ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्तांना 50 लाखांची लाच स्वीकारताना अटक झाली. हे उपायुक्त मिंधे गटाचे हस्तक होते. संपूर्ण महापालिकेमध्ये अशा प्रकारे लुटणार करणाऱ्या हस्तकांचा भरणा आहे. अख्ख्या शहरात आणि जिल्ह्यात एक प्रकारे जे वातावरण आहे हे महाराष्ट्राला कलंक लावणारे आहे. नाशिकमध्ये गुंडगिरीविरुद्ध मुख्यमंत्र्यांनी मोहीम सुरू केलेली आहे. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता, कोण कोणत्या पक्षाचा आहे याची फिकीर न करता त्यांनी पोलीस आयुक्तांना गुंडगिरी मोडून काढण्याचे जे आदेश दिले आहेत, अशा प्रकारचे आदेश त्यांनी ठाणे जिल्ह्यातील गुंडगिरीविरुद्ध देणे गरजेचे आहे, असे संजय राऊत म्हणाले.

ज्येष्ठ नेते, मंत्री गणेश नाईक यांनी सुद्धा ठाण्यातील रावणराज विरुद्ध आवाज उठवला आहे. ही सर्व हरामखोरी मोडून ठाण्यामध्ये जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी त्यांनी जनता दरबार सुरू केला, याबद्दल त्यांचे अभिनंदन. या अन्यायाविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेना, मनसे एकत्र मोर्चा काढत आहोत, असेही राऊत म्हणाले.

नाशिकमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेल्या गुंडांच्या टोळ्यांचाही बिमोड करण्याचे धोरण पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वीकारले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना तसे आदेश दिले आहेत. पक्ष न पाहता जनतेला छळणाऱ्या, शहरात दरोडेखोरी करणाऱ्यांना दया, माया दाखवू नका. याचे स्वागत असून नाशिकमध्ये तशी कारवाई होतानाही दिसत आहे. अशाच प्रकारची कारवाई ठाण्यातही व्हावी, अशी मागणी राऊत यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, पुणे हे एकेकाळी विद्येचे माहेरघर होते, सांस्कृतिक शहर होते. आज पुणे हे अजित पवारांमुळे आणि नंतर भाजपमधील काही घटकांमुळे गुंडांचे माहेरघर झालेले आहे. कोयता गँग ही संकल्पना पुण्यातून बाहेर आली. पोलीस आयुक्त काय करताहेत? तिकडल्या पोलीस आयुक्तांनी नाशिक शहरात ज्या काही घडामोडी सुरू आहेत त्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. पुण्यातही ठाण्या इतकीच जबरदस्त गुंडगिरी सुरू आहे, असेही राऊत म्हणाले.

Comments are closed.