ट्रॅक्टरवर ड्रायव्हर ठेवण्याच्या वादातून हाडोळती येथे तुंबळ हाणामारी, एकाची बोटे तुटली

अहमदपूर तालुक्यातील हाडोळती गावात ट्रॅक्टरवर ड्रायव्हर ठेवण्याच्या क्षुल्लक वादातून दोन गटात तुंबळ हाणामारीची गंभीर घटना घडली आहे. या हाणामारीत एका व्यक्तीला बऱ्याच जणांनी अमानुषपणे मारहाण केली. जर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर मोठा अनर्थ घडला असता.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोळे आणि अहमदपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी.डी. भूसनूर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून मारहाण होत असलेल्या व्यक्तीला बाजूच्या दुकानात सुरक्षित बंद केल्यामुळे त्याचे प्राण वाचले. या हाणामारीत एका व्यक्तीची बोटे तुटल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
सध्या हाडोळती येथील परिस्थिती पूर्णपणे पोलिसांच्या नियंत्रणात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोळे आणि पोलीस निरीक्षक बी.डी. भूसनूर हे स्वतः घटनास्थळी तळ ठोकून बसले आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत काही जणांना अटक केली असून, व्हिडिओतील इतर आरोपींचा शोध सुरू आहे. हाणामारीत जखमी झालेल्या व्यक्तींना पुढील उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलीस आरोपींची धरपकड करत असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. यावेळी पीएसआय आनंद श्रीमंगल पोलीस कर्मचारी बीट अमलदार ज्ञानोबा यमले, हनुमंत आरदवाड ,मारुती शिंदे ,बेंबडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावून परिस्थिती नियंत्रणात आणली व जमावापासून एका व्यक्तीचे प्राण वाचवले.
Comments are closed.