दिवाळीला खव्याचे पदार्थ बनवताय? मग थांबा भेसळयुक्त खवा असा ओळखा

दिवाळीचा सण म्हटले की घरोघरी फराळाचे पदार्थ बनवले जातात. त्यातच गोडाचे पदार्थ बनवताना खवा हा हमखास वापरला जातो. मात्र आजकाल बाजारात भेसळयुक्त खवा मिळत आहे. यामध्ये स्टार्च, कृत्रिम दूध आणि हानिकारक रसायने वापरलेली असतात, ज्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. अशा परिस्थितीत हा भेसळयुक्त खवा ओळखायचा कसा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर काही सोप्या टिप्स तुम्हाला मदत करू शकतात.

तळहातावर खवा रगडा
थोडा खवा घेऊन तुमच्या तळहातांवर रगडा. जर तुमच्या हाताला तूप लागलं आणि खव्याला दुधाप्रमाणे वास आला तर तो शुद्ध आहे. मात्र खवा हा चिकट आणि वास नसलेला असेल तर तो भेसळयुक्त असू शकतो.

पाणी
भेसळयुक्त खवा ओळखण्यासाठी हा आणखी एक सोपा मार्ग आहे. एक ग्लास कोमट पाण्यात खव्याचा एक छोटा तुकडा टाका. शुद्ध खवा हा पाण्यात मिसळत नाही, तर त्याचे तुकडे होतात आणि तो पाण्याच्या तळाशी बसतो. जर खव्यात स्टार्च किंवा पिठाची भेसळ असेल तर तो पाण्यात सहजपणे विरघळतो आणि पाण्याचा रंग पांढरा होतो.

गोळा
खव्याचा एक छोटा गोळा बनवून पाहा, जर खव्याचा गोळा सहज बनला तर तो शुद्ध आहे. जर गोळा फुटत असेल तर तो भेसळयुक्त असू शकतो.

उबदार
कढईत मंद आचेवर खवा हलका गरम करा. जर त्याला तूप सुटले तर तो शुद्ध आहे. पण गरम केल्यावर पाणी सुटले तर तो बनावट असू शकतो.

हेही महत्त्वाचे:
जर खाल्ल्यावर खवा टाळूला चिटकत असेल आणि त्याला नैसर्गिक दुधाचा वास येत नसेल तर तो भेसळयुक्त आहे.

Comments are closed.