दिवाळीत गोड खाण्यापूर्वी सावधान! मग खरी आणि भेसळयुक्त मिठाई ओळखायची कशी?

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि गोडधोडाचा सण. प्रत्येकाच्या घरात या दिवसांत लाडू, बर्फी, पेढे, काजू कतली, रसगुल्ले यांसारख्या स्वादिष्ट मिठाईंची रेलचेल असते. पण, या गोड पदार्थांच्या चमकदार पॅकिंगच्या मागे आरोग्यासाठी घातक ‘विष’ लपलेलं असू शकतं, हे अनेकांना ठाऊक नसतं. (how to dentify fake sweets in diwali marathi tips)

सणासुदीच्या काळात मिठाईची मागणी वाढते आणि त्याचाच गैरफायदा घेत अनेक ठिकाणी भेसळयुक्त मिठाई विकली जाते. स्वस्त आणि निकृष्ट दर्जाचा खवा, रासायनिक रंग, कृत्रिम सुगंध आणि धोकादायक रसायनांचा वापर करून या मिठाया बनवल्या जातात. अशा मिठाई खाल्ल्यास पोटाचे विकार, उलट्या, ताप, अॅलर्जी, यकृत आणि किडनीचे आजार यांसारखे गंभीर त्रास उद्भवू शकतात.

मग खरी आणि भेसळयुक्त मिठाई ओळखायची कशी? खाली काही सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत

1. मिठाईचा रंग तपासा:
खरी मिठाई सौम्य, नैसर्गिक रंगाची दिसते. जर रंग खूपच भडक, चमकदार किंवा बोटांवर चिटकणारा असेल, तर ती मिठाई भेसळयुक्त असू शकते.

2. चांदीचा वर्ख नीट बघा:
खऱ्या मिठाईवर लावलेला वर्ख सहज हातात निघतो आणि चकाकी कमी असते. नकली वर्ख अॅल्युमिनियमचा असू शकतो. तो बोटांनी चोळल्यावर काळा पडत नाही किंवा गोळा होत नाही, तर तो आरोग्यासाठी धोकादायक असू शकतो.

3. खवा गरम करून पहा:
थोडासा खवा घेऊन तो हलका गरम करा. जर तो वितळण्याऐवजी गोळा झाला किंवा त्यातून तेल बाहेर आलं नाही, तर त्यात मैदा किंवा स्टार्च मिसळलेला असू शकतो.

4. पाण्यात विरघळवून तपासा:
थोडा मावा किंवा पनीर गरम पाण्यात टाका. जर पांढरे अवशेष दिसले किंवा थर तयार झाला, तर ती मिठाई भेसळयुक्त आहे. अस्सल मावा सहज विरघळतो आणि गाळ राहात नाही.

5. गंध आणि चव पहा:
ताज्या भेसळ न केलेल्या मिठाईला दुधाचा गोड सुगंध येतो. जर मिठाईला रसायनासारखा वास येत असेल किंवा चव खवट, कृत्रिम वाटत असेल, तर ती मिठाई सुरक्षित नाही.

6. मिठाई गरम करून तपासा:
थोडा तुकडा आगीवर ठेवला असता जर तो पटकन जळून रासायनिक धूर देत असेल, तर ती मिठाई भेसळयुक्त असण्याची शक्यता जास्त आहे.

दिवाळीचा आनंद आरोग्याच्या किंमतीवर घेऊ नका. मिठाई खरेदी करताना नेहमी विश्वासार्ह दुकानदार निवडा, पॅकिंगवरील तारीख तपासा आणि शक्य असल्यास घरीच गोड पदार्थ बनवा. अस्सल चव आणि सुरक्षित आरोग्य, दोन्ही तुमच्या हातात आहे.

( टीप: वरील माहिती ही सामान्य माहिती करता दिलेली आहे My Mahanagar Live याची पुष्टी करत नाही आमचा उद्देश केवळ तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Comments are closed.