रवींद्र जडेजाने मोडला हरभजन सिंगचा विक्रम! अनिल कुंबळेच्या खास क्लबमध्ये समावेश
वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने अप्रतिम गोलंदाजी केली.
त्याला फलंदाजीची संधी मिळाली नाही. पण गोलंदाजीत त्याने दमदार खेळ करत मोठा विक्रम आपल्या नावावर केला. जड्डूने हरभजन सिंगचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. आता त्याने अनिल कुंबळे आणि आर. अश्विन यांच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात जडेजाने जबरदस्त गोलंदाजी सादर केली.
जडेजा आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी घरच्या मैदानावर सर्वाधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने हरभजन सिंगला मागे टाकले आहे, ज्याने 376 बळी घेतले होते. पण आता जड्डू 377 बळींसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.
या यादीत पहिल्या क्रमांकावर अनिल कुंबळे आहेत, ज्यांनी 476 बळी घेतले आहेत. तर आर. अश्विन 475 बळींसह दुसऱ्या स्थानावर आहेत. जडेजाने वेस्ट इंडिजचा सलामी फलंदाज जॉन कॅम्पबेलला बाद करून ही कामगिरी साध्य केली. कॅम्पबेलने या सामन्यात 115 धावांची खेळी केली होती. धडाकेबाज फॉर्मात दिसत असलेल्या कॅम्पबेलला जडेजाने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
पहिल्या डावात रवींद्र जडेजाने 19 षटकांची गोलंदाजी करत 3 फलंदाजांना बाद केले. याशिवाय दुसऱ्या डावात तो आत्तापर्यंत फक्त 1च बळी घेऊ शकला आहे. अशा प्रकारे जडेजाने दोन्ही डाव मिळून आतापर्यंत एकूण 4 बळी घेतले आहेत.
भारताने प्रथम फलंदाजी करत 134.2 षटकांत 518/5 धावा करून डाव घोषित केला होता. त्याच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजची संघ 81.5 षटकांत 248 धावांवर गारद झाली. फॉलो-ऑन मिळाल्यानंतर वेस्ट इंडिजने चौथ्या दिवसाच्या चहापर्यंत 109 षटकांत 9 गडी गमावून 361 धावा केल्या आहेत.
Comments are closed.