IND Vs WI 2nd Test – चौथ्या दिवसाचा खेळ संपला, टीम इंडियाला जिंकण्यासाठी आता फक्त 58 धावांची गरज

फोटो – बीसीसीआय

दिल्ली कसोटीवर टीम इंडियाचे चांगली पकड निर्माण केली असून टीम इंडियाने चौथ्या दिवसाअखेर एक विकेट गमावत 63 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाला आता जिंकण्यासाठी फक्त 58 धावांची गरज आहे. तर वेस्ट इंडिजला जिंकण्यासाठी 9 विकेटची आवश्यकता आहे. सध्या केएल राहुल (25*) आणि साई सुदर्शन (30*) फलंदाजी करत आहेत.

सामन्याचा चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजने आपल्या दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केली. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा वेस्ट इंडिजने 2 गड्यांच्या मोबदल्यात 170 धावा केल्या होत्या. सलामीला आलेल्या जॉन कॅम्पेबल (115), शाई होप (103), रोस्टन चेस (40), जस्टिन ग्रीव्हज (नाबाद 50) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीमुळे वेस्ट इंडिजचा संघ सर्वगडी बाद 390 धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे टीम इंडियाला जिंकण्यासाठी 121 धावांच आव्हान मिळालं.

आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर यशस्वी जयस्वाल (08) स्वस्तात माघारी परतला. परंतु केएल राहुल आणि साई सुदर्शनने संयमी फलंदाजी करत संघाचा डाव सावरला आहे. दिवसा अखेर टीम इंडियाने एक विकेट गमावत 63 धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाला आता सामना आणि मालिका जिंकण्यासाठी फक्त 58 धावांची गरज आहे.

Comments are closed.