हवामान खात्याचा पाच दिवसांसाठी ‘अलर्ट’; विदर्भ, मराठवाडय़ात वादळी पावसाची शक्यता

मान्सूनने काढता पाय घेतल्यानंतर ‘ऑक्टोबर हीट’ची तीव्रता वाढली आहे. याचदरम्यान हवामानात पुन्हा मोठा बदल होऊन येत्या मंगळवारपासून राज्याच्या अनेक भागांत वादळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 14 ते 18 ऑक्टोबर या पाच दिवसांमध्ये विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पाऊस पडेल. कित्येक भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी लागेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरडे हवामान आहे. आकाश निरभ्र असल्याने ऑक्टोबर हीटचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे, मात्र पुढील पाच दिवसांत हवामानचक्रामध्ये मोठा बदल होऊन पावसाच्या जोरदार हजेरीची शक्यता आहे. संभाव्य वादळी पावसाचा विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला पुन्हा तडाखा बसण्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे. मध्य महाराष्ट्र आणि खान्देशच्या काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना हवामान खाते आणि पृषी विभागाने सतर्प केले आहे.

Comments are closed.