दक्षिण आफ्रिकेच्या विजयामुळे भारताच्या सेमीफायनल आशांना धक्का, टॉप-4 मधून बाहेर पडण्याची शक्यता

दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने ICC वुमेन्स क्रिकेट वर्ल्ड कप 2025 च्या 14 व्या सामन्यात बांगलादेशवर थरारक विजय मिळवत स्पर्धेतील सलग तिसरा सामना जिंकला. इंग्लंडकडून 10 विकेट्सनी झालेल्या पराभवानंतर आफ्रिकेने जबरदस्त पुनरागमन करत वर्ल्ड कपच्या गुणतालिकेतही झेप घेतली आहे. या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे, तर भारताला एका स्थानाचा फटका बसून चौथ्या क्रमांकावर घसरावं लागलं आहे.

या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 बाद 232 धावा केल्या. शर्मिन अख्तर आणि शोरना अख्तर यांनी अर्धशतके झळकावली. विशेष म्हणजे शोरनाने फक्त 35 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावत बांगलादेश वुमेन्स संघासाठी सर्वात जलद फिफ्टी करण्याचा विक्रम केला. प्रत्युत्तरात, दक्षिण आफ्रिकेची सुरुवात डळमळीत होती. केवळ 78 धावांवर पाच फलंदाज माघारी गेले होते.

मात्र, त्यानंतर अनुभवी मारिजान काप (56) आणि क्लो ट्रायन (62) यांनी संयमित आणि महत्त्वपूर्ण 85 धावांची भागीदारी करत संघाला सावरले. ही जोडी विभाजित झाल्यानंतर संघ पुन्हा संकटात सापडला, पण अखेरच्या फळीत फलंदाजीस आलेल्या नादिन डी क्लार्कने 29 चेंडूंमध्ये 37 धावांची धडाकेबाज खेळी करत आफ्रिकेला अवघ्या 3 चेंडू शिल्लक असताना 3 विकेट्सने विजय मिळवून दिला.

पॉइंट्स टेबल (14 व्या सामन्यापर्यंत)

क्रमांक युनियन समोर विजय पराभव मालमत्ता एनआरआर
1 ऑस्ट्रेलिया 4 3 0 7 +1.353
2 इंग्लंड 3 3 0 6 +1.864
3 दक्षिण आफ्रिका 4 3 1 6 -0.618
4 भारत 4 2 2 4 +0.682
5 न्यूझीलंड 3 1 2 2 -0.245
6 बांगलादेश 4 1 3 2 -0.263
7 श्रीलंका 3 0 2 1 -1.526
8 पाकिस्तान 3 0 3 0 -1.887

या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेचे 4 सामन्यांत 3 विजयांसह 6 गुण झाले असून संघ तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. त्यांचा नेट रन रेट सध्या -0.618 असून, हे भविष्यात धोका ठरू शकते. भारताने सुरुवातीचे दोन सामने जिंकल्यानंतर सलग दोन पराभव झेलले आहेत – एक दक्षिण आफ्रिकेकडून आणि दुसरा ऑस्ट्रेलियाकडून. त्यामुळे भारत चौथ्या स्थानी घसरला आहे आणि टॉप-4 मधून बाहेर पडण्याचा धोका वाढला आहे.

दरम्यान, आज (14 ऑक्टोबर) न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगणार आहे. न्यूझीलंडचा मोठ्या फरकाने विजय भारताला चौथ्या स्थानावरून खाली ढकलू शकतो. त्यामुळे हरमनप्रीत कौर आणि संघासाठी पुढील सामने निर्णायक ठरणार आहेत.

Comments are closed.