भारत-कॅनडा संबंध सुधारण्याची स्थिती
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांचा विश्वास
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मध्यंतरीच्या काळात तणावग्रस्त झालेले भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध आता टप्प्याटप्प्याने सुधारत आहेत, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. कॅनडाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री अनिता आनंद सध्या भारताच्या दौऱ्यावर असून त्यांनी सोमवारी जयशंकर यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध आणि जागतिक स्थिती यांच्यावर चर्चा केली. भारत भेटीदरम्यान कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री अनिता आनंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेत त्यांच्याशी काही विषयांवर चर्चा केली.
अनिता आनंद यांचे रविवारी भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आगमन झाले. त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये घनिष्ट संबंध पुन्हा प्रस्थापित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मध्यंतरीच्या काळात हरदीपसिंग निज्जर या खलिस्तानवादी नेत्याची कॅनडात हत्या करण्यात आली होती. ही हत्या घडविण्यात भारताच्या सरकारचा हात आहे, असा उघड आरोप कॅनडाचे तत्कालीन नेते जस्टीन ट्रूडो यांनी कॅनडाच्या संसदेत केला होता. भारताने हा आरोप पूर्णत: फेटाळला होता. मात्र ट्रूडो यांच्या या बिनबुडाच्या आरोपामुळे भारत आणि कॅनडा यांच्या संबंधात दुरावा निर्माण झाला होता. दोन्ही देशांनी आपापल्या उच्चायोग कार्यालयातील अधिकाऱ्यांना माघारी बोलाविले होते.
ट्रूडो यांचा पदत्याग
भारतावर केलेल्या आरोपांचा कोणताही पुरावा ट्रूडो सादर करु शकले नाहीत. आपल्याजवळ कोणताही पुरावा नाही. पण आपण हा आरोप अनधिकृत गुप्त माहितीच्या आधारावर केला आहे, अशी कबुली त्यांना नंतर द्यावी लागली होती. तथापि, त्यांची लोकप्रियता घसरणीस लागल्याने त्यांना नेतेपद सोडावे लागले होते. त्यानंतर कॅनडात संसदेची निवडणूक झाली. या निवडणुकीनंतर मार्क कर्नी यांच्या नेतृत्वात त्या देशात नवे सरकार स्थापन झाले. या सरकारचा परराष्ट्र विभाग अनिता आनंद या भारतीय वंशाच्या महिलेकडे सोपविण्यात आला. त्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध पुन्हा सुरळीत होण्यास प्रारंभ झाला आहे.
अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य
जयशंकर आणि आनंद यांच्या सोमवारी झालेल्या चर्चेत अनेक महत्वाच्या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशाच्या सहकार्याची रुपरेषा निर्धारित करण्यात आली आहे. द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान, शांततामय अणुकार्यक्रम आणि ऊर्जानिर्मिती अशा अनेक क्षेत्रांसंबंधी चर्चा झाली असून येत्या काळात या सर्व क्षेत्रांमध्ये दोन्ही देश एकमेकांना मोलाचे साहाय्य करतील, असे दिसून आले. कॅनडा हा एक मुक्त व्यवस्थेचा, लोकशाही मानणारा, बहुवांशिक आणि विविधता असणाऱ्या समाजाचा देश आहे. भारताचीही हीच वैशिष्ट्यो आहेत. त्यामुळे दोन्ही देश पुन्हा एकमेकांशी योग्य प्रकारे जुळवून घेऊ शकतात. या प्रक्रियेचा प्रारंभ आता झाला आहे, असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनी केले.
पायाभरणी करण्याचे उत्तरदायित्व
भारत आणि कॅनडा यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये घनिष्ट संबंध पुनर्स्थापित करण्यासाठी योग्य अशी पायाभरणी करण्याचे काम दोन्ही परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचे आहे. दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांच्या मनात असणारे संबंध प्रत्यक्षात निर्माण होण्यासाठी, तसेच दोन्ही देशांमधील जनतेच्या आकांक्षा पूर्ण व्हाव्यात असे संबंध स्थापित करण्यासाठी वातावरण निर्मिती करणे, हे आमचे प्रमुख उत्तरदायित्व असून आम्ही त्यादिशेने पावले टाकावयास प्रारंभ केला आहे, असे प्रतिपादन भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी पत्रकारांशी बोलताना सोमवारी केले.
परिस्थिती मूळपदावर आणणार…
ड भारत आणि कॅनडा यांच्यामधील संबंध पुन्हा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न
ड ऊर्जानिर्मिती, आण्विक सहकार्य, कृत्रिम बुद्धिमत्ता विकास यांच्यावर भर
ड मधल्या काळातील कटुता विसरून एकमेकांशी सहकार्य करण्याचा निर्धार
Comments are closed.