रायगड जिल्हा परिषदेत सीईओंच्या दालनातच माजी आमदाराचे ‘झोपा’ आंदोलन; शिक्षकांच्या रिक्त पदांवरून संताप

राज्यात भाजपची सत्ता असूनही त्यांच्या पक्षाचे कर्जतमधील माजी आमदार सुरेश लाड यांनी आज रायगड जिल्हा परिषदेत सीईओंच्या दालनातच झोपून अनोखे आंदोलन केले. कर्जत तालुक्यात शिक्षकांची ४० पदे रिक्त असतानाही समायोजन करताना १०० शिक्षकांची अन्यत्र बदली करण्यात आली. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी शिकायचं तरी कसं, असा संतप्त सवाल लाड यांना आपल्याच पक्षाच्या सरकारला केला. तसेच अधिकाऱ्यांनादेखील चांगलेच धारेवर धरले. या आंदोलनाची सध्या रायगडात चर्चा सुरू आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम झाल्यानंतर संतापलेले माजी आमदार सुरेश लाड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांचे दालन गाठले आणि आत जाऊन त्यांनी मॅट अंथरून थेट पथारी मारली. एवढेच नव्हे तर सरकारच्या कारभारावर ताशेरे मारत भोसले यांना धारेवर धरले.

अदिती तटकरे यांनाही विचारला जाब
आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण आज महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. सोहळ्याच्या सुरुवातीलाच सुरेश लाड यांनी कर्जत तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न उपस्थित केला. त्यावरून तटकरे व लाड यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. कर्जत नव्हे तर आमच्याही तालुक्यात अशीच स्थिती असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले. त्यामुळे चिडलेल्या लाड यांनी अहो, तुम्ही मंत्री आहात. तुम्ही तुमच्या तालुक्यासाठी काहीही करू शक्ता. आमच्या कर्जतमधील गोरगरीब विद्यार्थ्यांनी पुरेसे शिक्षक नसतील तर शिकायचे तरी कसे असा थेट सवाल केला. त्यानंतर लाड यांनी थेट सीईओंचे दालन गाठून त्यांच्या दालनात आंदोलन सुरू केले.

Comments are closed.