व्हॉट्सअ‍ॅप हा मूलभूत हक्क नाही

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, झोहोला दिले समर्थन

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

‘व्हॉटस्अप’ या माध्यमाचा उपयोग करणे हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित करावा, अशी मागणी करणारी एका महिला डॉक्टरची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. व्हॉटस्अपने या महिलेचे खाते ब्लॉक केले होते. त्यामुळे तिने सर्वोच्च न्यायालयात व्हॉटस्अप विरोधात याचिका सादर केली होती. मात्र, व्हॉटस्अप ही एक खासगी कंपनी असून तिचा उपयोग हा मूलभूत अधिकार  असू शकत नाही. या कंपनीने काही कारणास्तव या महिलेचे खाते ब्लॉक केले असेल, तर तिने ‘झोहो अर्ताई’ या नव्या माध्यमाचा उपयोग करावा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. हा निर्णय आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देणारा ठरला असून त्यासाठी त्याचे कौतुक होत आहे. झोहो ही भारतीय कंपनी आहे.

खासगी डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग करण्याचा मूलभूत अधिकार कोणालाही मिळू शकत नाही. अनेक खासगी माध्यमे उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग आवश्यकता भासल्यास केला जाऊ शकतो. भारताच्या राज्यघटनेत खासगी माध्यमाचा उपयोग करण्याचा अधिकार हा मूलभूत मानण्यात आलेला नाही. त्यामुळे न्यायालय असा अधिकार कोणालाही देऊ शकत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने झोहो आर्ताईचा  उपयोग करण्याची सूचना केली.

अरात्ताईच्या प्रभावाचा विस्तार

झोहो या संपूर्ण भारतीय कंपनीने व्हॉटस्अपला  स्पर्धा करण्यासाठी आपले स्वत:चे आणि संपूर्ण भारतीय निर्मितीचे अरात्ताई हे माध्यम उपलब्ध करुन दिले आहे. जास्तीत जास्त भारतीयांनी या भारतीय माध्यमाचा उपयोग करावा, असे आवाहन अनेक मान्यवरांनी केले आहे. केंद्र सरकारनेही झोहोच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील 12 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना हे अॅप उपयोगात आणण्याची सूचना करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये या अॅपचा बोलबाला आहे. आतापर्यंत असंख्य जणांनी हे अॅप डाऊनलोड केले आहे.

अनेक वैशिष्ट्यो

या नव्या भारतीय अॅपची अनेक वैशिष्ट्यो आहेत. त्याचा वेग अधिक आहे. त्यावरुन ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल्स सहजपणे करता येतात. एंड टू एंड एन्क्रिप्शन मिळते. डेस्कटॉप आणि अँड्रॉइड तसेच अनेक टीव्ही अॅप्सना अॅक्सेस मिळू शकतो. ब्रॉडकास्टिंग अपडेडस् मिळविण्यासाठी स्टोरीज आणि चॅनेल्सची व्यवस्था उपलब्ध आहे. अशाप्रकारे हे प्रभावी माध्यम म्हणून पुढे येत आहे. प्रत्येक भारतीयाने आता हे अॅप घेऊन भारताचा लाभ करून द्यावा. विदेशी अॅप्सऐवजी हे तितकेच किंवा त्याहूनही चांगले अॅप उपयोगाता आणावे, असे आवाहन अनेक तज्ञांनी आणि मान्यवरांनी भारतीयांना केले आहे.

Comments are closed.