प्राणघातक खोकला सिरप कंपनीचा परवाना रद्द केला

तामिळनाहडू सरकारकडून अखेर कारवाई : कंपनीला ठोकले टाळे

वृत्तसंस्था/ कांचीपुरम

तामिळनाडूत भेसळयुक्त कफ सिरप कोल्ड्रिफ तयार करणाऱ्या श्रीन फार्मास्युटिकल कंपनीचा उत्पादन परवाना पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. तसेच कंपनीला बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्य सरकारने सोमवारी याविषयी माहिती दिली. राज्य औषध नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांना पाहणीदरम्यान कफ सिरपमध्ये 48.6 टक्के डायएथिलिन ग्लायकॉल (डीईजी) नावाचा एक विषारी पदार्थ आढळून आला होता. हे औषध मध्यप्रदेश आणि राजस्थानातील मुलांच्या मृत्यूंशी निगडित आहे.

कंपनीत योग्य उत्पादन प्रथा (जीएमपी) आणि योग्य प्रयोगशाळा प्रथांचा (जीएलपी) अभाव होता असे अधिकाऱ्यांना आढळून आले. कंपनीने 300 हून अधिक गंभीर आणि मोठी उल्लंघनं केली आहेत. कंपनीचे मालक जी. रंगनाथन यांना अलिकडेच मध्यप्रदेशच्या विशेष तपास पथकाने अटक केली होती. रंगनाथन यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  श्रीसन फार्मास्युटिकल्सचा औषध उत्पादनाचा परवाना पूर्णपणे रद्द करण्यात आला असून कंपनीला बंद करण्यात आले आहे. तामिळनाडूतील अन्य औषध कंपन्यांचे विस्तृत निरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आल्याचे राज्य सरकारने एका पत्रकाद्वारे सांगितले आहे. तामिळनाडू सरकारने 2 वरिष्ठ औषध निरीक्षकांना निलंबित केले आहे.

मध्यप्रदेशात 22 मुलांचा मृत्यू

मध्यप्रदेशात एका मागोमाग एक 22 मुलांचा मृत्यू कोल्ड्रिफ कफ सिरपच्या सेवनानंतर झाला होता. यानंतर कोल्ड्रिफ कफ सिरपवर अनेक राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. याप्रकरणाच्या तपासासाठी मध्यप्रदेश सरकारने एसआयटी स्थापन केली आहे, परंतु कोल्ड्रिफ कफ सिरप तयार करणाऱ्या कंपनीचा प्रकल्प तामिळनाडूत आहे. विषारी कोल्ड्रिफ कफ सिरपप्रकरणी भाजप नेते के. अण्णामलाई यांनी तामिळनाडू सरकारवर टीका केली होती. चहुबाजूने टीका होऊ लागल्यावर तामिळनाडू सरकारने कारवाईचे पाऊल उचलले आहे.

श्रीसन फार्माच्या 7 ठिकाणांवर ईडीचे छापे

कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे अनेक मुलांच्या मृत्यूप्रकरणी ईडीने मोठी कारवाई करत श्रीसन फार्माच्या चेन्नई येथील ठिकाणांवर आणि तामिळनाडूच्या औषध नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. ही कारवाई पीएमएलए अंतर्गत करण्यात आली आहे. तामिळनाडू औषध नियंत्रण कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावरही छापे टाकण्यात आले आहेत. मध्यप्रदेश आणि तामिळनाडूत श्रीसन फार्मास्युटिकल्सच्या विरोधात नोंद तक्रारींची दखल घेत ईडीने हे पाऊल उचलले आहे.

Comments are closed.