भारताचा पुढचा स्टार ओपनर! रोहितच्या जागेसाठी आकाश चोप्रानं घेतलं या खेळाडूचं नाव

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी सलामीवीर रोहित शर्मा आता केवळ वनडे फॉरमॅटमध्येच खेळत आहे, आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरचा शेवटचा काळ सुरू झाला आहे, असं मानलं जात आहे. त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी वनडे संघात निवडण्यात आलं आहे, मात्र कर्णधारपदाची धुरा शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे.

रोहित शर्मा 2027 च्या वनडे वर्ल्ड कपकडे लक्ष ठेवून खेळत आहे, परंतु तेव्हापर्यंत त्याचे वय 40 च्या पुढे जाईल. वनडे क्रिकेटमध्ये “हिटमॅन” म्हणून ओळखला जाणारा रोहित त्याच्या आक्रमक ओपनिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या सुरुवातीच्या खेळीमुळे अनेकदा प्रतिस्पर्धी संघांचे मनोबल खचले आहे.

रोहित जेव्हा वनडेतून निवृत्त होईल, तेव्हा क्रिकेटप्रेमींना त्याच्या आक्रमक ओपनिंगची नक्कीच उणीव भासेल. मात्र, माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राला तसं वाटत नाही. त्याने आधीच रोहितचा पर्याय शोधून काढला आहे, तोही एक असा खेळाडू, ज्याने आत्तापर्यंत फक्त एकच वनडे सामना खेळला आहे.

हा खेळाडू म्हणजे यशस्वी जयस्वाल. कसोटीत आपली गुणवत्ता सिद्ध केलेला हा सलामीवीर इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या मालिकांमध्ये झळाळून निघाला आहे. दिल्ली कसोटीत त्याने 175 धावांची खेळी केली होती.

जयस्वालने 26 कसोटी सामने खेळले असून फक्त 1 वनडे आणि 23 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

आकाश चोप्राने आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हटलं की, “यशस्वी लवकरच भारताच्या तिन्ही फॉरमॅट्समधील नियमित सदस्य होईल. तो आधीच टी20 मध्ये प्रभावी ठरला आहे आणि एक शतकही झळकावलं आहे. आयपीएलमध्येही त्याची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली आहे.”

चोप्रा पुढे म्हणाला, “शुबमन गिलकडे नेतृत्व आलं आणि तो पुढे गेला, पण यशस्वीची वेळ लवकरच येणार आहे. त्याला फार काळ प्रतीक्षा करायला लावू नये. अभिषेक शर्माच्या वनडे संघात समावेशाची चर्चा असली, तरी यशस्वीला आधी संधी मिळायला हवी. तो जर गिलसोबत ओपनिंग करेल, तर लोकांना रोहित शर्माचीही आठवण येणार नाही!”

Comments are closed.