IND vs WI: केएल राहुल, रवींद्र जडेजा, शुबमन गिल की कुलदीप यादव- कोण ठरला सामनावीर आणि मालिकावीर? जाणून घ्या

शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत दोन सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकली. दिल्लीमध्ये पार पडलेल्या या निर्णायक सामन्यात भारताला शेवटच्या दिवशी विजयासाठी केवळ 58 धावांची गरज होती. केएल राहुलने संयमी अर्धशतक ठोकत भारताला अवघ्या एका तासात विजयी केले. वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करत भारतासमोर 121 धावांचं आव्हान उभं केलं होतं, पण टीम इंडियाच्या फलंदाजांनी सहज विजय मिळवला.

या सामन्यात फिरकीपटू कुलदीप यादव चमकला. त्याने एकूण 8 बळी टिपत वेस्ट इंडिजच्या दोन्ही डावांमध्ये भारताला वर्चस्व गाजवण्यास मदत केली. पहिल्या डावात त्याने 5 विकेट घेतल्या तर दुसऱ्या डावात 3 बळी घेतले. त्याच्या या प्रभावी कामगिरीसाठी त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा बहुमान देण्यात आला. दुसरीकडे, मालिकेतील दोन्ही कसोटीत बॅट आणि बॉलने जबरदस्त खेळी करणाऱ्या रवींद्र जडेजाला ‘प्लेयर ऑफ द सिरीज’चा पुरस्कार मिळाला. अहमदाबाद
कसोटीमध्ये त्याने शतक झळकावले आणि दोन्ही सामन्यांमध्ये मिळून 8 विकेट्स घेतल्या.

भारताच्या पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल आणि शुबमन गिलने मोठी भागीदारी करत संघाला भक्कम स्थितीत नेले. जयस्वालने 175 धावांची तर गिलने नाबाद 129 धावांची खेळी केली. भारताने 518 धावा करत डाव घोषित केला. वेस्ट इंडिजचा पहिला डाव 248 धावांत संपुष्टात आला, ज्यामुळे भारताने त्यांना फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजने 390 धावा केल्या, पण ते पुरेसं ठरलं नाही. भारताने 121 धावांचं लक्ष्य 7 विकेट राखून पूर्ण करत मालिका आपली केली.

या विजयासह गिलच्या नेतृत्वातील टीम इंडियाने आणखी एक मालिकेत क्लिन स्वीप करत आगामी मालिकांसाठी आत्मविश्वास मिळवला आहे. टीमची फलंदाजी, फिरकी आणि नेतृत्व तीनही आघाड्यांवर कामगिरी लक्षवेधी ठरली आहे.

Comments are closed.