निवडणुका जवळ येत आहेत, परंतु वाद अजूनही जोरात सुरू आहेत
लालू यादव यांनी वाटलेली तिकीटे तेजस्वी यादव यांच्याकडून रद्द, एनडीएतही गदारोळ, आरोपयुद्ध
वृत्तसंस्था / नवी दिल्ली, पाटणा
बिहारची विधानसभा निवडणूक आता अगदी तोंडावर आली आहे. तरीही या निवडणुकीतील प्रमुख प्रतिस्पर्धी असणाऱ्या आघाड्यांमध्ये अद्यापही जागावाटपाच्या प्रश्नावरुन प्रचंड गोंधळाचे वातावरण दिसून येत आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महागठबंधन या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटपावरुन वादविवाद आहेत.
घटकपक्षांमध्ये जागावाटपाची घोषणा करण्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बाजी मारली आहे. या आघाडीने सर्वप्रथम जागावाटप घोषित केले. त्यानुसार भारतीय जनता पक्ष 101, संयुक्त जनता दल 101, लोकजनशक्ती 29 आणि इतर दोन छेटे पक्ष प्रत्येकी 6 जागांवर निवडणूक लढवितील, अशी घोषणा तीन दिवसांपूर्वी करण्यात आली होती. तथापि, या आघाडीत विशिष्ट जागा कोणत्या पक्षाने लढवायच्या यावर वाद होत आहे. येत्या दोन दिवसांमध्ये तो शमविला जाईल, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दलाकडून करण्यात आले.
महागाथबानत महागोंडहल
राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्या महागठबंधन या आघाडीत तर प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. एका नेत्याने दिलेली तिकिटे दुसऱ्या नेत्याकडून कापली जात आहेत. सोमवारी सकाळी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी आपल्या निष्ठावंतांना तिकिटांचे वाटप करुन तशी घोषणाही केली. तथापि, रात्री त्यांचे पुत्र आणि राजकीय वारसदार तेजस्वी यादव यांनी यांच्यातील बहुतेक तिकिटे रद्द केली. त्यामुळे पक्षात मोठ्या प्रमाणात संताप आणि नाराजी यांची लाट आल्याचे पहावयास मिळत आहे. या पक्षात या घटनेमुळे अद्यापही उमेदवारांची निवड आणि तिकिट वाटप रेंगाळलेले असल्याचे दिसते.
राजद-काँग्रेस वाद
गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 75 जागा देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांच्यापैकी केवळ 19 जागांवरच पक्ष विजयी होऊ शकला होता. काँग्रेसच्या वाईट कामगिरीमुळेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीला निसटते बहुमत मिळू शकले होते, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. परिणामी, यावेळी काँग्रेसला 50 जागा देण्यासाठी राष्ट्रीय जनता दल तयार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय जनता दल हा महागठबंधनमधील सर्वात मोठा पक्ष किमान 150 जागांवर लढण्याची तयारी करीत आहे. डावे पक्षही त्यांना मिळालेल्या जागांवर समाधानी दिसत नाहीत. त्यामुळे जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही.
छोटे पक्ष, मोठ्या मागण्या…
महागठबंधचे नेते मुकेश सहानी यांच्या विकासशील इन्सान पक्षाने 40 जागांची मागणी केली आहे. तथापि, या पक्षाला जास्तीत जास्त 10 ते 12 जागा दिल्या जातील, अशी शक्यता आहे. डाव्या पक्षांची मागणी 50 जागांची आहे. त्यांनाही या मागणीच्या निम्म्या जागाही मिळणार नाहीत, अशी शक्यता आहे. मतदानाचा प्रथम टप्पा 6 नोव्हेंबरला असतानाही विवाद न थांबणे चिंताजनक आहे, अशी प्रतिक्रिया महागठबंधनच्या एका नेत्याने पत्रकारांसमोर व्यक्त केली आहे.
जागावाटपाचा तिढा
राष्ट्रीय लोकशाही आघाडीतही मतभेद आहेत. तथापि, ते उघड होऊ नयेत, म्हणून दक्षता घेतली जात आहे. जागावाटपात या आघाडीने बाजी मारली आणि कोणता घटकपक्ष किती जागा लढविणार, याची आकडेवारी घोषित झाली आहे. तथापि, कोणत्या जागेवर कोण लढणार हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे. भारतीय जनता पक्षाच्या काही जागा संयुक्त जनता दलाने मागितल्या आहेत, तर आपल्या काही जागा भारतीय जनता पक्षाला देऊ केल्या आहेत. तथापि, अद्याप तडजोड झालेली नाही. चिराग पासवान यांनी संयुक्त जनता दलाच्या काही जागा मागितल्या आहेत. अशा प्रकारे दोन्ही आघाड्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
Comments are closed.