गायक मैथिली ठाकूर भाजपामध्ये सामील झाले
बिहार निवडणुकीसाठी पक्षाची प्रथम सूची घोषित
वृत्तसंस्था / पाटणा
सुप्रसिद्ध भजन आणि भक्तीगीत गायिका मैथिली ठाकूर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे भारतीय जनता पक्षाच्या बिहार शाखेचे अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांच्या उपस्थितीत त्यांनी या पक्षात मंगळवारी प्रवेश केला. अशा प्रकारे त्यांनी आपला राजकीय कार्यकाळाचा प्रारंभ केला आहे. राजकारणात प्रवेश करण्याची आपली इच्छा असल्याचे त्यांनी गेल्या आठवड्यातच स्पष्ट केले होते. तसेच भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिल्यास बिहार विधानसभा निवडणूक लढविण्यासही आपण सज्ज आहोत, असे प्रतिपादन केले होते. पक्षप्रवेश केल्यानंत आता त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या संघर्षात येण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. मधुबनी आणि दरभंगा या दोन्ही स्थानी आपला प्रभाव असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. मात्र, याच निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली जाईल काय, यासंबंधी स्थिती अद्याप अस्पष्ट आहे.
भारतीय जनता पक्षाने मंगळवारी संध्याकाळी आपल्या उमेदवारांची प्रथम सूची घोषित केली आहे. या सूचीत 71 उमेदवारांची नावे आहेत. राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते सम्राट चौधरी तारापूर मतदारसंघातून पुन्हा रिंगणात येणार आहेत. तर विजय कुमार सिन्हा यांना लाखीसराई मतदारसंघ देण्यात आला आहे. तसेच विद्यमान मंत्री नितीन नबीन (बांकीपूर), रेणूदेवी (बेतीया), तर विद्यमान मंत्री मंगल पांडे (सिवान) ही इतर महत्वाची नावे सूचीत आहेत.
युनायटेड जनता जनता दालमध्ये मतभेदांचे मतभेद आहेत
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलात जागावाटपावरुन मतभेद निर्माण झाले आहेत. उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता असणाऱ्या काही नेत्यांनी मंगळवारी पाटणा येथे पक्षाच्या मुख्यालयासमोर धरणे धरले होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते या नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोणताही नेता पक्षाच्या आदेशाविरोधात काम करणार नसून सर्व नेते पक्षाच्या आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विजयासठी एकजुटीने काम करतील, असा ठाम विश्वास संयुक्त जनता दलाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या हिंदुस्थान आवाम मोर्चाचे नेते आणि विद्यमान मंत्री जीतनराम मांझी हे प्रथम जागा वाटपासंबंधात नाराज असल्याचे वृत्त होते. तथापि, मंगळवारी त्यांनी कोणतीही नाराजी नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वावर आपला पूर्ण विश्वास असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विजय मिळेल आणि पुन्हा आमचेच सरकार राज्यात येईल. राज्याच्या चौफेर प्रगतीसाठी असे होणे आवश्यक आहे, असे स्पष्ट विधान मांझी यांनी केल्याने मतभेद नसल्याचे स्पष्ट होत आहे.
आम्ही पाच पांडव
राष्ट्रीय लोकशाही आघाडीत जागा वाटप आणि उमेदवारी यांच्यावरुन कोणतेही मतभेद नाहीत. आमच्या आघाडीतले सर्व पाच घटकपक्ष पाच पांडवांप्रमाणे एकजूट आहेत. आम्ही मोठ्या संग्रामासाठी सज्ज आहोत. आमच्यामध्ये कोणतेही गैरसमज नाहीत. सर्व घटकपक्षांच्या सहमतीने जागावाटप निश्चित करण्यात आले असून, येत्या एक दोन दिवसांमध्ये प्रत्येक घटक पक्ष आपल्या उमेदवारांची नावे घोषित करणार आहे. त्यातून आमच्या एकात्मतेचा परिचय मिळेल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या बिहार शाखेचे अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी व्यक्त केला आहे.
6 नोव्हेंबरला प्रथम टप्पा
बिहारची विधानसभा निवडणूक यावेळी दोन टप्प्यांमध्ये होणार असून मतदानाचा प्रथम टप्पा 6 नोव्हेंबरला आहे. द्वितीय टप्पा 11 नोव्हेंबरला आहे. प्रथम टप्प्यात 121 तर दुसऱ्या टप्प्यात 122 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. दोन्ही टप्प्यांची मतगणना 14 नोव्हेंबरला केली जाणार आहे. सध्याच्या बिहार विधानसभेचा कालावधी 22 नोव्हेंबरपर्यंत आहे. त्याच्या आत नवे सरकार स्थापन करण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने निवडणुकीचे वेळापत्रक सज्ज करण्यात आले आहे. मुख्य संघर्ष मागच्या निवडणुकीप्रमाणेच विद्यमान सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महागठबंधन यांच्यात होणार हे स्पष्ट दिसत आहे.
Comments are closed.