कसोटी क्रिकेटमधील ‘लो-फॉर्म’ यादीत बाबर आझम अव्वल; एका भारतीय खेळाडूचाही समावेश
पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझम सध्या अत्यंत खराब फॉर्ममधून जात आहे. एकेकाळी सतत धावा ओतणारा हा खेळाडू आता मोठी खेळी करण्यासाठी झगडताना दिसतोय. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या घरच्या कसोटीतही त्याच्याकडून अपेक्षेप्रमाणे प्रदर्शन झालं नाही. चांगली सुरुवात करूनही तो पुन्हा अपयशी ठरला आणि आता त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील आशियाई फलंदाजांमध्ये सर्वात वाईट सरासरीचा विक्रम नोंदवला गेला आहे.
बाबर आझमचा खराब फॉर्म सुरूच आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या घरच्या कसोटीत चांगली सुरुवात करूनही, तो मोठी खेळी करू शकला नाही. आता त्याच्याकडे सर्वात वाईट सरासरीचा विक्रम आहे. बाबर आझम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या डावात 23 आणि दुसऱ्या डावात 42 धावांवर बाद झाला. यामुळे 2023 पासून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सरासरी असलेल्या आशियाई फलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानावर आहे. या काळात बाबर आझमने 24.25 च्या सरासरीने 655 धावा केल्या आहेत.
पाकिस्तानचा आणखी एक फलंदाज अब्दुल्ला शफीक देखील या यादीत आहे. 2023 पासून त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 26.09 च्या सरासरीने 574 धावा केल्या आहेत. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या कसोटीत पहिल्या डावात 2 आणि दुसऱ्या डावात 41 धावा करून बाद झाला.
बांगलादेशचा वरिष्ठ फलंदाज लिटन दास देखील गेल्या दोन वर्षांत खराब फॉर्ममध्ये आहे. त्याने 2023 पासून 29.39 च्या सरासरीने 676 धावा केल्या आहेत.
भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा देखील या यादीत आहे. कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या रोहित शर्माने 2023 पासून या खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत, 1164 धावा, परंतु त्याची सरासरी 30.36 आहे.
Comments are closed.