घाऊक महागाई दर 0.13 टक्के
वाणिज्य मंत्रालयाकडून आकडेवारी जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाई दर कमी होत 0.13 टक्क्यांवर आला आहे. तुलनेत अन्नधान्य स्वस्त झाल्याने महागाई दर कमी झाला आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात घाऊक महागाईदर 0.52 टक्के राहिला होता. वाणिज्य मंत्रालयाने मंगळवारी घाऊक महागाईचे आकडे जारी केले आहेत.
प्रायमरी आर्टिकल्सचा महागाई दर उणे 2.10 टक्क्यांवरून कमी होत उणे 3.32 टक्के झाला आहे. अन्नधान्याचा महागाई दर 0.21 टक्क्यांवरून कमी होत उणे 1.99 टक्के झाला आहे. तर इंधन आणि ऊर्जेचा घाऊक महागाई दर उणे 3.17 टक्क्यांवरून वाढत उणे 2.58 टक्के राहिला. निर्मित उत्पादनांचा घाऊक महागाई दर 2.55 टक्क्यांवरून कमी होत 2.33 टक्क्यांवर आला आहे. सप्टेंबरमध्ये भाज्यांच्या किमती 24.41 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत, तर ऑगस्टमध्ये ही घट 14.18 टक्के होता.
घाऊक महागाई दर दीर्घकाळापर्यंत वाढीव राहिल्यास उत्पादन क्षेत्रावर याचा प्रतिकूल प्रभाव पडत असतो. घाऊक महागाई दर अधिक काळापर्यंत उंच स्तरावर राहिल्यास उत्पादक याचा भार ग्राहकांवर टाकत असतात. सरकार केवळ कराच्या माध्यमातून घाऊक महागाई दराला नियंत्रित करू शकते.
रिझर्व्ह बँकेने चालू महिन्याच्या प्रारंभी धोरणात्मक दरांना 5.5 टक्क्यांवर अपरिवर्तित ठेवले होते. तर सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर देखील 8 वर्षांच्या नीचांकी स्तरावर म्हणजेच 1.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. अनुकूल मान्सूननंतर खरीप पिकांची कापणी आणि रबी पिकांच्या पुरवठ्यामुळे अन्न महागाईवर पुढील काळात नियंत्रण मिळविणे शक्य होणार असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे.
Comments are closed.