कधी, कुठे आणि कोणाविरुद्ध भिडणार भारत? WTC 2025-27 मध्ये टीम इंडियाची अग्निपरीक्षा, पाहा संपूर्ण वेळापत्रक
भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांची मालिका 2-0 ने जिंकत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 च्या चक्रातील आपली विजयी घोडदौड सुरू केली आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासाठी ही विजय मालिका अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरली आहे.
भारताने अहमदाबाद आणि दिल्ली येथे झालेल्या कसोटींमध्ये प्रभावी खेळ करत वेस्ट इंडिजवर वर्चस्व प्रस्थापित केले. या विजयामुळे भारताने WTC च्या चौथ्या पर्वात आपली पहिली मालिका जिंकण्याचा मान पटकावला आहे. मागील तीन पर्वांमध्ये दोनदा अंतिम फेरी गाठणाऱ्या भारतासाठी ही मालिका आत्मविश्वास वाढवणारी ठरली आहे.
सध्या WTC 2025-27 च्या पॉइंट्स टेबलमध्ये भारत 61.90% विजय टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारतापुढे सध्या ऑस्ट्रेलिया (100%) आणि श्रीलंका (66.67%) हे दोन संघ आहेत. विशेष म्हणजे, भारत हा आतापर्यंत या चक्रात दोन मालिका खेळणारा एकमेव संघ ठरला आहे.
भारतीय संघाचा आगामी वेळापत्रक देखील तितकाच आव्हानात्मक आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये भारतातच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. त्यानंतर 2026 मध्ये भारताचा श्रीलंका आणि न्यूझीलंड दौरा निश्चित झाला आहे. 2027 मध्ये भारतातच ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी रंगणार आहे.
भारतासाठी परदेशातील दौरे नेहमीच कठीण ठरले आहेत. यंदा 9 वर्षांनंतर भारतीय संघ श्रीलंकेच्या कसोटी दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये दोन कसोटींनी मालिका खेळली जाणार आहे. भारताने 2009 नंतर न्यूझीलंडमध्ये कसोटी सामना जिंकलेला नाही, हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे.
भारताने आजपर्यंत WTC स्पर्धा जिंकलेली नाही. 2021 मध्ये न्यूझीलंड आणि 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता. 2025 मध्ये तर भारत अंतिम फेरीपर्यंतही पोहोचू शकला नाही. त्यामुळे यंदाच्या चक्रात गिलच्या नेतृत्वात संघ पहिल्या विजेतेपदासाठी जोरदार प्रयत्न करत आहे.
Comments are closed.