IPS पुरण कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार

7 ऑक्टोबरला केली होती आत्महत्या : नवव्या दिवशी शवविच्छेदन : दोन्ही मुलींनी दिला चितेला अग्नी

वृत्तसंस्था/ चंदीगड

हरियाणातील आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्यावर बुधवारी तब्बल नऊ दिवसांनंतर चंदीगड येथील सेक्टर 25 स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यापूर्वी बुधवारी सकाळी त्यांच्या शरीराचे शवविच्छेदन करण्यात आले. हरियाणा कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असलेल्या वाय. पुरण कुमार यांनी 7 ऑक्टोबर रोजी चंदीगड येथील सेक्टर 11 मधील आपल्या निवासस्थानी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती.

पुरण कुमार यांना बुधवारी शासकीय सन्मानाने अंतिम निरोप देण्यात आला. अंत्यसंस्कारप्रसंगी त्यांच्या दोन्ही मुलींनी चितेला अग्नी दिला. याप्रसंगी पूरण कुमार यांच्या पत्नी आयएएस अमानित कुमार ह्या भावनिक झालेल्या दिसून आल्या. कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांचे सांत्वन केले. पुरण कुमार यांनी आत्महत्या केल्यापासून मागील आठवडाभर बराच गोंधळ सुरू होता. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी हरियाणाचे डीजीपी शत्रुघ्न कपूर यांच्यासह 15 अधिकाऱ्यांवर छळ केल्याचा आरोप केला. तेव्हापासून त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम हा वादाचा विषय ठरला होता. त्यांची पत्नी आणि कुटुंबातील सदस्य आरोपी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यावर ठाम होते.

रोहतकमध्ये एएसआय संदीप कुमार यांनी आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले. त्यांनी आयपीएस पुरण कुमार यांच्यावरच भ्रष्टाचाराचा आरोप केला. याचदरम्यान अखेर नवव्या दिवशी कुटुंबाने पोस्टमॉर्टेम करण्यास सहमती दर्शविली. पीजीआयमध्ये पोस्टमॉर्टेम केल्यानंतर त्यांचा मृतदेह दुपारी 3 वाजता त्यांच्या सेक्टर 24 येथील निवासस्थानी नेण्यात आला. तेथून त्यांची अंत्ययात्रा सुरू झाल्यानंतर दुपारी 4 नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Comments are closed.