फॉक्सकॉनच्या गुंतवणुकीवर स्टॅलिनचा पेच
खोटा दावा केल्याचे उघड : भाजप-अण्णाद्रमुकने साधला निशाणा
वृत्तसंस्था/ चेन्नई
जगातील सर्वात मोठी कॉन्ट्रॅक्ट मोबाइल निर्माता कंपनी फॉक्सकॉन तामिळनाडूत 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचा दावा एम.के. स्टॅलिन सरकारने केला होता. परंतु नव्या गुंतवणुकीच्या वृत्तांना कंपनीने नाकारल्याने द्रमुक सरकारची मोठी फजिती झाली आहे. राज्यातील विरोधी पक्ष अण्णाद्रमुक आणि भाजपने या प्रकरणी द्रमुकला लक्ष्य केले आहे. स्टॅलिन सरकार हे पूर्णपणे खोटारडे असल्याची टीका अण्णाद्रमुकने केली आहे.
स्टॅलिन यांनी तामिळनाडूत कंपनीकडून मोठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याचा खोटा दावा करण्यात आल्याचा आरोप अण्णाद्रमुकने केला आहे. तसेच अण्णाद्रमुकने मुख्यमंत्र्यांच्या ‘स्टॅलिन मॉडेल’ची थट्टा करत जर तुम्ही खोटे बोलत असाल तर कमीतकमी त्याला विश्वसनीय स्वरुप तरी द्या अशी उपरोधिक टीका केली आहे. द्र्रमुक सरकारमधील मंत्र्यांच्या विदेश दौऱ्यांमुळे राज्याला प्रत्यक्षात कुठलाच लाभ होत नसल्याचा दावा अण्णाद्रमुकने केला आहे.
फॉक्सकॉनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची भेट घेत 15 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची योजना मांडली असल्याची घोषणा द्रमुकने केली होती. परंतु नंतर फॉक्सकॉनने अशाप्रकारची कुठलीच चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले होते.
अण्णाद्रमुककडून लक्ष्य
फॉक्सकॉननने मुख्यमंत्री स्टॅलिन यांची भेट घेतली असून कंपनी 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या तयारीत असल्याची घोषणा द्रमुक सरकारने केली आहे. मुख्यमंत्र्यांनी याला गर्वाने ‘स्टॅलिन मॉडेलचे पालन’ ठरविले आहे. परंतु आता फॉक्सकॉनने प्रस्तावित गुंतवणुकीच्या संबंधी अशाप्रकारची कुठलीच चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे. अशास्थितीत स्टॅलिन यांनी भले खोटं बोलताना कमीतकमी त्याला विश्वसनीय रुप द्यावे असा सल्ला देत असल्याची उपहासात्मक टिप्पणी अण्णाद्रमुकने केली आहे. दरवर्षी मुख्यमंत्री विदेश दौऱ्यांवर जातात, परंतु त्यातून तामिळनाडूला काहीच प्राप्त होत नाही. दरवेळी स्टॅलिन हे केवळ कागद दाखवत असतात अशी टीका विरोधी पक्षाकडून करण्यात आली आहे.
राजकारण तापले
फॉक्सकॉनच्या भारतातील प्रतिनिधीने मुख्यमंत्री स्टॅलिन यांची भेट घेतली होती, परंतु कुठल्याही नव्या गुंतवणुकीवर चर्चा झाली नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी 13 ऑक्टोबर रोजी फॉक्सकॉन 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास आणि 14 हजार कुशल रोजगार निर्माण करण्यास तयार असून यामुळे राज्याच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि अत्याधुनिक निर्मितीला बळ मिळणार असल्याचा दावा तामिळनाडू सरकारच्या एका एजेन्सीने केला होता.
ही गुंतवणूक मैलाचा दगड
मुख्यमंत्री स्टॅलिन आणि राज्याचे उद्योगमंत्री राजा यांनी सोशल मीडियावर या कथित गुंतवणुकीला तामिळनाडूसाठी मैलाचा दगड ठरविले होते. फॉक्सकॉन तामिळनाडूत स्वत:च्या नव्या पिढीचे उत्पादन, संशोधन आणि विकास तसेच एआय तंत्रज्ञान आणणार आहे. कंपनी 15 हजार कोटीची गुंतवणूक आणि 14 हजार रोजगार निर्माण करणार असल्याने इंजिनियर्सनी सज्ज व्हावे असे मंत्री राजा यांनी म्हटले हेते. स्टॅलिन यांनी याला ‘द्रविड मॉडेल’चा हिस्सा ठरवत हे तामिळनाडूला दक्षिण आशियाचे उत्पादन आणि नवोन्मेषाचे केंद्र करणार असल्याचा दावा केला होता.
एक श्वेतपत्रिका सोडा
फॉक्सकॉन विषयक राज्य सरकारचा दावा अर्ध्या दिवसात खोटा ठरला आहे. राज्य सरकारने आता गुंतवणुकीवर श्वेतपत्र जारी करावे अशी मागणी पीएमके नेते डॉ. अंबुमणि रामदास यांनी केली आहे. भाजप प्रवक्ते नारायणन तिरुपित यांनी याला ‘द्रविड असत्य आणि तामिळनाडूसाठी लाजिरवाणे’ संबोधिल आहे
Comments are closed.