पाकिस्तानातून होणारा आर्थिक लाभ आणि अहंकारामुळे हिंदुस्थानशी संबंध बिघडले; अमेरिकेच्या माजी राजदूताचा ट्रम्प यांच्यावर निशाणा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला अमेरिकतूनच विरोध होत आहे. तेथील अनेक तज्ज्ञांनी हिंदुस्थानवर लादलेला टॅरिफ अयोग्य असून त्याचा अमेरिकेला मोठा फटका बसेल, असा इशाराही दिला होता. आता अमेरिकेचे जपानमधील माजी राजदूत रहम इमॅन्युएल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तीव्र हल्ला चढवला आहे. त्यांनी कठेर शब्दांत या धोरणाला विरोध केला असून यामागे ट्रम्प यांचा स्वार्थ असल्याचाही दावा केला आहे.
पाकिस्तानकडून होणारा थोडासा आर्थिक लाभ, लोभ, स्वार्थ आणि अहंकार यामुळे ट्रम्प यांनी अमेरिकेचे हिंदुस्थानसोबतचे ४० वर्षांचे धोरणात्मक संबंध उद्ध्वस्त केले. रहम इमॅन्युएल म्हणाले की ही केवळ एक राजनैतिक चूक नाही तर एक धोरणात्मक चूक देखील आहे, ज्याचा चीनने गैरफायदा घेतला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या वैयक्तिक हितसंबंधांमुळे आणि अहंकारामुळे हिंदुस्थान-अमेरिका संबंध बिघडवलेले. त्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी हिंदुस्थानसोबतची अनेक दशके जुनी धोरणात्मक भागीदारी धोक्यात आणली. राष्ट्रपती ट्रम्प यांनी हिंदुस्थानसोबतचे संबंध खराब केले कारण त्यांचा अहंकार मार्गात आला आणि पाकिस्तानकडून त्यांच्या मुलाला पैसे देण्यात आले, असा दावाही त्यांनी केला आहे.
पाकिस्तानने केवळ ट्रम्प यांच्या मुलालाच नव्हे तर उद्योगपती विटकॉफ यांच्या मुलालाही पैसे पुरवले. त्यांनी म्हटले की हे अमेरिकेच्या दीर्घकालीन इंडो-पॅसिफिक हितसंबंधांसाठी धोकादायक वळण आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेची विश्वासार्हता कमी झाली आहे आणि चीनला आशियामध्ये आघाडी मिळवून दिली आहे. चीनने या परिस्थितीचा फायदा घेतला आणि हिंदुस्थानबाबत अमेरिकेच्या राजनैतिक अपयशाला आपल्या फायद्यात बदलले.
रहम इमॅन्युएल यांनी यापूर्वी शिकागोचे महापौर आणि बराक ओबामा यांच्या काळात चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम पाहिले आहे. इमॅन्युएलच्या या दाव्यामुळे अमेरिकन राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Comments are closed.