Diwali 2025 : रेडिमेड रांगोळीचा ट्रेंड आणि मेड इन इंडियाचे दिवे
चैताली शिंदे
मुंबई : दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण आहे. देशभरात दिवाळीचा जल्लोष केला जातो. त्यामुळे दरवर्षी बाजारात दिवाळीसाठी नवनव्या वस्तू दाखल होतात आणि त्या सर्वांना आकर्षित करणाऱ्या असतात. त्याप्रमाणे यंदा बाजारात रेडिमेड रांगोळीचे साचे, रांगोळीचे रंगासहित स्टिकर्स आणि रांगोळीच्या स्टेनसिल्स आल्या आहेत. यामुळे हाताने रांगोळी काढता येत नसली तरी काही मिनिटांत सुंदर, सुबक रांगोळी काढण्याचे कौशल्य विकसित झाले आहे. दरवर्षी रांगोळीसाठी रंगाची खरेदी केली जाते. मात्र, बदलत्या काळानुसार रेडिमेड रांगोळी ट्रेंडिंगमध्ये आहे.
खऱ्या रंगाचे स्टिकर्स
यंदाच्या दिवाळीत नवीन काय याला खऱ्या रंगाचे रांगोळी स्टिकर्स हे उत्तर आहे. या स्टिकर्सवर मागे प्लास्टिकचा वापर करण्यात आला आहे. हाताने काढलेल्या रांगोळीप्रमाणे हे स्टिकर्स दिसतात. या रांगोळीची खासियत म्हणजे व्यवस्थित वापरल्यास स्टिकर्स दोन-तीन वर्षे टिकू शकतात, असे व्यापारी सांगतात. दारासमोर, देवघरासमोर, अंगणात लावण्यासाठी स्टिकर्स रांगोळी सोयीची ठरत आहे. रांगोळीचे स्टिकर्स लहान-मोठे आकाराचे आणि विविध डिझाइन्समध्ये मिळतात. त्यांची किंमत 50 रुपयांपासून सुरू होते. यात फुले, पाने, देवी, श्री गणेश, शुभ चिन्हे, रांगोळी पट्टा, संस्कारभारती अशा विविध डिझाइनआहेत.
हेही वाचा – Diwali Shopping : स्वस्त दरात शॉपिंग करायचीय? हे आहेत मुंबईतील बेस्ट मार्केट
पूर्वी ठिपक्यांची, चाळणीच्या साहाय्याने झटपट रांगोळी काढली जायची. आता त्यांची जागा आकर्षक रेडिमेड रांगोळ्यांनी घेतली आहे. त्यामुळे नोकरदार किंवा गृहिणी रांगोळी काढण्याचा वेळ वाचवण्यासाठी सुंदर स्टिकर रांगोळी खरेदी करताना दिसत आहेत.
अॅक्रेलिक आणि मेटॅलिक रांगोळी
बाजारात रेडिमेड रांगोळ्यामध्ये प्रचंड विविधता पाहायला मिळत आहे. यात प्लास्टिक, अॅक्रेलिक, मेटॅलिक पत्रे कंट करून त्यावर सुंदर डिझाइन तयार करण्यात आल्या आहेत. या रांगोळ्याची किंमत 150 रुपयांपासून सुरू होते. ज्या आकाराची आणि बारीक डिझाइन घ्याल त्यानुसार त्याची किंमत आहे. अॅक्रेलिकच्या या डिझाइन्सवर मोती, काचा, विविध आकर्षक रंग वापरण्यात आले आहेत.
“अॅक्रेलिकच्या या रांगोळीचे एक-एक भाग वेगळे होतात. त्यामुळे तुम्ही हव्या त्या डिझाइनमध्ये ही रांगोळी तयार करू शकता. विशेष म्हणजे या रांगोळ्या दिवाळीनंतरही घराची शोभा वाढवण्यासाठी वापरता येतात. त्यामुळे जास्त पैसे खर्च करून खरेदी केल्या जात आहेत.”
– मानसी पावसकर, विक्रेत्या (माहीम)
स्टेनसिल्सचा पर्याय
ज्यांना रांगोळी काढता येत नाही मात्र, रंग भरायला आवडतात त्यांच्यासाठी स्टेनसिल्सचा पर्याय उत्तम आहे. यात छोटी छोटी शुभचिन्हे ते लहान मोठ्या आकाराच्या डिझाइन्स उपलब्ध आहेत. यांची किंमत अंदाजे 100 रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत आहे. यात विविध पक्षांचे आकार, कुयरी अशा डिझाइन मिळत आहेत.
एलईडी दिवे आणि मेणाच्या पणत्या
दिवाळीसाठी एलईडी दिवे आणि मेणाच्या पणत्या बाजारात आल्या आहेत. अगदी 5-10 रुपयांपासून मातीच्या पणत्या, 100 रुपयांपासून एलईडी दिवे आणि आकर्षक रंगाच्या, आकाराच्या मेणाच्या पणत्यांना पसंती मिळत आहे. सर्वत्र चायना आयटम दिसत असले तरी यंदा मेड इन इंडियाचे दिवे बाजारात आले आहेत.
“झगमगते चायना दिवे, मेणाच्या पणत्यांमध्ये कितीही नाविन्य आले तरीही पारंपरिक पणत्यांना आजही विशेष पसंती दिली जाते”.
– तेजश्री शिंदे, विक्रेत्या
रंगांचे सेट
यंदा रांगोळीच्या रंग विक्रीत मोठा बदल झाला आहे. यावेळी तयार रांगोळीच्या रंगाचा सेट बाजारात आला आहे. ज्यात तुम्हाला 10 रंगांच्या बाटल्या मिळतात. यात गडद आणि सौम्य छटांचा समावेश आहे. ज्याची किंमत सुमारे 200 रुपयांपासून सुरू होते. तर सुट्टे रंग हे 20 रुपयांपासून (एक ग्लास) मिळतात.
हेही वाचा – Diwali 2025: मुंबईतील सर्वात जुनी कंदील गल्ली आणि कलाकारांची तयारी
Comments are closed.