हिमालय हलवणं सोपं, पण रोहित-विराट नाही!  बापात दम असेल, त्यांना रोखून दाखवा असे सिद्धू यांचे आव्हान

हिंदुस्थानच्या क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा नवजोतसिंग सिद्धूंचा आवाज घुमला आणि तोही त्यांच्या नेहमीच्या मिश्कील, ठसक्याच्या अंदाजात. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या वन डे भविष्यावर चाललेल्या चर्चा व अफवांना तिलांजली देत रोहित शर्मा आणि विराट कोहलीला खेळण्यापासून कुणी रोखू शकत नाही आणि कुणाच्या बापात दम असेल तर त्यांनी हे करूनच दाखवा, असे आव्हानही दिले आहे.

गेली अनेक दिवस रोहित आणि विराटबाबत अनेक चर्चांना अक्षरशः उधाण आले आहे. त्याबाबत सिद्धू म्हणाले, विराट आणि रोहित म्हणजे हिंदुस्थानी क्रिकेटचे हिमालय आहेत. त्यांना कोणी हलवू शकतं का? ज्याच्या बापात दम असेल त्याने थांबवून दाखवावं! त्यांच्या या वाक्याने चाहत्यांच्या चेहऱयावर हास्य फुललं आणि टीकाकारांना चपराक बसली. कारण बोलण्याची ही सिद्धूंची खास शैली, थोडी विनोदी, थोडी टोकदार, पण थेट हृदयात घुसणारी.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया वन डे मालिकेत विराट आणि रोहित या दोघांचे पुनरागमन होत असताना त्यांच्या 2027 विश्वचषकापर्यंत खेळण्याबाबत चर्चेचं वारे सुटले होते. पण सिद्धूंनी स्पष्टपणे सांगितले की, या दोघांची उपस्थितीच हिंदुस्थानी संघाची खरी ताकद आहे. ते म्हणाले, विराट आणि रोहित यांनी फक्त रेकॉर्ड्स केले नाहीत, तर हिंदुस्थानी क्रिकेटची संस्कृतीच बदलली. त्यांनी जिंकण्याची मानसिकता दिली, शिस्त शिकवली आणि संघाला जागतिक पातळीवर शक्तिशाली केले.

सिद्धू पुढे म्हणाले, ‘सूर्याला कोणी विचारतं का की तू खरंच चमकतोस का? विराट आणि रोहितचा प्रभाव असाच आहे. त्यांच्या तेजानेच हिंदुस्थानी क्रिकेट उजळतं. येणाऱया पिढय़ा त्यांना ‘सुवर्णयुगाचे स्तंभ’ म्हणून पाहतील.’

बदलांविषयी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा आपली तिखट मिश्कील शैली दाखवली. ‘प्रत्येक बदल प्रगती नसते. खरी प्रगती तीच, जी मजबूत पाया असलेल्या भिंतीवर उभी असते आणि तो पाया म्हणजे रोहित आणि विराट. ज्यांनी हिंदुस्थानी क्रिकेटला उंच नेलं, तीच असली ‘रो-को’ जोडी आहे,’ असे ते म्हणाले.

सिद्धूंच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर प्रचंड खळबळ माजली आहे. अनेक चाहत्यांनी त्यांच्या शब्दांना पाठिंबा देत लिहिलं, ‘विराट आणि रोहितला निवृत्ती सांगणं म्हणजे क्रिकेटचा अपमान आहे’. ‘काहींनी तर त्यांच्या विधानाला सिद्धू स्टाईलमध्ये दिलेला स्ट्रेट ड्राईव्ह,’ असे संबोधले.

Comments are closed.