ठाण्यातील 102 रुग्णवाहिका चालकांची दिवाळी अंधारात, सहा महिन्यांपासून ठेकेदाराने पगारच दिला नाही

रुग्णसेवेसाठी अहोरात्र कार्यरत राहणाऱ्या 102 रुग्णवाहिकांवरील कंत्राटी चालकांची यंदाची दिवाळी अंधारात आहे. ठाणे जिह्यातील रुग्णालये व आरोग्य केंद्रात रुग्णवाहिकांचे कंत्राट ठाणे जिल्हा परिषदेने मे. बरकत कंपनीला दिले असून या ठेकेदार कंपनीने रुग्णवाहिका चालकांना सहा महिने वेतनच दिलेले नाही. पगार मिळत नसल्याने या चालकांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. याविरोधात कामगार सातत्याने आवाज उठवत आहेत, मात्र महायुती सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
गावपाडय़ांतील दुर्गम भागातील रुग्णांसाठी 102 क्रमांकाची रुग्णवाहिका जीवनवाहिनी ठरली आहे. गरोदर माता असोत नाहीतर आपत्कालीन मदतीची वेळ असो या रुग्णवाहिका सज्ज असतात. संकटाला धावणाया या चालकांवरच महायुती सरकारच्या काळात संकट कोसळले आहे. शहापूर तालुक्यातील चालकांना तर पुणी वालीच उरलेलं नाही. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य पेंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी 102 क्रमांकाच्या रुग्णवाहिका काही वर्षांपूर्वी कार्यरत करण्यात आल्या. या रुग्णवाहिकांचे कंत्राट ठाणे जिल्हा परिषदेने मे. बरकत या कपंनीला दिले. परंतु, या ठेकेदार कंपनीकडून चालकांना नुसते राबवून घेण्यात येत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना पगारच देण्यात आलेला नाही.
शहापूर तालुक्यात 8 रुग्णवाहिका चालक 24 तास सेवा देतात. या चालकांना सहा महिने पगार मिळालेला नाही. त्यामुळे ते उधारी, उसनवारी करून घर चालवत आहेत. गणेशोत्सवादरम्याने रुग्णवाहिका चालकांनी ठाणे जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता. मात्र, दिवाळीआधी तुमचे पगार मिळतील, असे सांगून त्यांचे आंदोलन थांबवण्यात आले. आता दिवाळी आली तरी त्यांना एक छदामही कंत्राटदाराने दिलेला नाही. नोकरी जाण्याची भीती असल्याने पगाराविनाही चालक सेवेत तत्पर आहेत मात्र त्यांच्या घरी ऐन दिवाळीत अंधार पसरला आहे.
उसने पैसे घेऊन केला वडिलांचा अंत्यविधी
शहापूरमधील एका चालकावर बिकट प्रसंग ओढवला आहे. त्याचे वडील आजारी होते. उपचारांसाठी उसनवारी करावी लागली. त्यात त्यांचे निधन झाले मात्र अंत्यविधीसाठीही या चालकाकडे पैसे नव्हते. मित्रांकडून उसने पैसै घेऊन आणि पत्नीचे दागिने विकून त्याने अंत्यविधी पार पाडले. इतरांना रुग्णसेवा वेळेत मिळावी म्हणून झटणाऱ्या या चालकाच्या पदरी मात्र फरफट आली.
Comments are closed.