पोलादी भिंतीपलीकडील हातांनी उजळले दिवाळीच्या आनंदाचे दीप, डोंगरी बालगृहात दीपावलीची धम्माल

दिवाळीचा उत्साह टिपेला पोहचला आहे. डोंगरी बालगृहाच्या पोलादी भिंतीच्या आत असलेल्या बालकांनीही दीपावलीची जय्यत तयारी सुरू केली आहे. येथील तब्बल 60 बालकांनी कंदील, पणत्या, तोरणे, पर्यावरणपूरक बॅग, शोभेच्या लाकडी वस्तू आदी साहित्य तयार करून तेजोमय दिवाळीला हातभार लावला आहे.
18 वर्षांखालील अल्पवयीन आरोपींना डोंगरी निरीक्षण व बालगृहात ठेवण्यात येते. तेथे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. शिक्षण, कला, विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यातून त्यांना सुप्त गुण दाखविण्याची संधी मिळते. यंदाच्या दिवाळीत या मुलांनी काहीतरी हटके करण्याची इच्छा अधीक्षकांकडे बोलून दाखवली. मग जिल्हा महिला व बाल विकास मुंबई शहर व मुख्य अधिकारी प्रवीण भावसार, अधीक्षक राहुल कंठीकर व तेथील शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन केले. त्यानुसार मुलांनी विविध वस्तू बनवल्या. या वस्तूंचे प्रदर्शन बालगृहात भरविण्यात आले असून त्यास ग्राहकांची पसंती मिळत आहे.
पणत्या, कापडी बॅगाना सर्वाधिक मागणी
बालकांनी बनविलेल्या साहित्यांपैकी पणत्या व कापडी बॅगांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. या दोन साहित्यांचा जास्त मागणी असून बालकांची ही कलापुसर खरेदी करण्यास प्राधान्य मिळत असल्याचे चित्र आहे.
बालगृहात मुला-मुलींना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यामुळे त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो. दिवाळीनिमित्त या मुलांनी आकर्षक वस्तू बनवल्या आहेत. याचा त्यांना भविष्यात नक्कीच फायदा होईल.
राहुल कंठीकर (अधीक्षक, डोंगरी बालगृह)
Comments are closed.