शुभमनची पहिली वन डे परीक्षा उद्यापासून कोहली-रोहित गुरू, अक्षरचा भरपूर ‘सल्ला’

रविवारपासून सुरू होणाऱया हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेकडे क्रिकेटविश्वाचे डोळे लागले आहेत. कारण पहिल्यांदाच शुभमन गिल हिंदुस्थानच्या वनडे संघाचे नेतृत्व करणार आहे. आणि त्याच्या मागे आहेत दोन अनुभवी सिंह अर्थातच विराट कोहली आणि रोहित शर्मा. म्हणजेच कर्णधार शुभमनची बॅट चालली तर वाहवा, नाही चालली तर ‘सल्ल्यांचा पाऊस’ आधीच सज्ज आहे!

हिंदुस्थानचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने तर थेट सांगितले, ‘शुभमनसाठी विराट-रोहितची उपस्थिती म्हणजे क्रिकेटमधील दोन चालतेबोलते यूटय़ूब टय़ुटोरियल्स आहेत!’ म्हणजे सामना तापला तर अनुभवाचा तडका नक्की मिळणार.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर विराट-रोहित प्रथमच एकत्र मैदानावर उतरणार आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचा उत्साहही स्टेडियमच्या छतापलीकडे गेलाय आणि त्यातच रोहितकडून कर्णधारपद काढून घेऊन शुभमनच्या खांद्यावर ती ‘सोनेरी पण भारी’ जबाबदारी दिल्याने चर्चा रंगल्या आहेत – कुणी म्हणतं ‘तरुण रक्ताला संधी’, तर कुणी म्हणतं ‘अनुभवाचा अपमान.’. पण अक्षरचं म्हणणं स्पष्ट आहे-दोघंही (रोहित-विराट) तंदुरुस्त दिसताहेत. शुभमनला कर्णधारपदात त्यांचा साथ-सल्ला मिळाला तर त्याचं नेतृत्व ‘अमृताहूनही गोड’ होईल!’’

दरम्यान, हिंदुस्थानच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियामध्ये भरपूर क्रिकेट खेळलेले असल्याने संघ मानसिकदृष्टय़ा तयार आहे. ड्रेसिंग रूममध्ये रणनीतीचे सत्र सुरू आहे. कुणी बॅट पुसतोय, कुणी फिल्डिंगचे इशारे करतोय आणि कुणीतरी आतून कुजबुजतोय, भाई, पहिला सामना जिंकला तर सगळं क्षम्य आहे!. तापमानवाढीमुळे पर्थची खेळपट्टी अग्निपथ ठरू नये.

Comments are closed.