Erectile Dysfunction: पुरुषांच्या नपुंसकतेची कारणांमध्ये अपुऱ्या झोपेचा ही समावेश, वाचा तज्ञ काय सांगतात
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत झोप हा अनेकांच्या आयुष्यातील ‘लक्झरी’ विषय बनला आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे, ऑफिसचं काम पूर्ण करणे, सोशल मीडियावर वेळ घालवणे, किंवा पार्टी करणे या सगळ्यामुळे शरीराला मिळणारी आवश्यक झोप कमी होत चालली आहे. झोपेची ही कमतरता फक्त थकवा किंवा चिडचिड वाढवत नाही, तर पुरुषांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहे. (lack of sleep causes erectile dysfunction in men)
अनेक संशोधनांमध्ये हे स्पष्ट झालं आहे की झोप न मिळाल्याने इरेक्टाइल डिसफंक्शन म्हणजेच नपुंसकतेची समस्या वाढते. रात्री योग्य झोप न घेतल्याने शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते, टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण कमी होतं, आणि त्यामुळे लैंगिक आरोग्यावर थेट परिणाम होतो.
एनसीबीआयच्या एका अहवालानुसार, जे पुरुष रोज 5 ते 6 तासांपेक्षा कमी झोप घेतात, त्यांच्यात इरेक्टाइल डिसफंक्शन होण्याचा धोका दुप्पट असतो. सतत झोपेचा अभाव राहिल्यास शरीरातील रक्तप्रवाहावरही परिणाम होतो, जो लैंगिक क्षमतेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.
त्याचप्रमाणे, स्लीप एपनिया ही झोपेत श्वास अडखळण्याची समस्या पुरुषांमध्ये सर्वाधिक दिसते. ही समस्या वाढल्यास झोप पूर्ण होत नाही आणि त्याचे परिणाम लैंगिक आरोग्यावर दिसून येतात. याशिवाय, वृद्ध पुरुषांमध्ये दिसणाऱ्या लोअर यूरिनरी ट्रॅक्ट सिंड्रोम (LUTS) या समस्येमुळे वारंवार लघवी लागणे, मूत्राशय अपूर्ण रिकामे होणे अशा अडचणी झोपेवर परिणाम करतात. झोपेचा अभाव वाढला की या तक्रारी आणखी तीव्र होतात, आणि नपुंसकतेचा धोका वाढतो.
झोप न मिळाल्याने शुक्राणूंची निर्मिती कमी होते, ज्यामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. कमी झोपेमुळे शरीराचा नैसर्गिक दुरुस्तीचा चक्र विस्कळीत होतं आणि त्याचा एकूणच आरोग्यावर वाईट परिणाम दिसतो.
झोप सुधारण्यासाठी काही सोपे उपाय:
1.रात्री झोपण्यापूर्वी पाय किंवा तळवे मसाज करा रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीराला विश्रांती मिळते.
2.हळदीचं दूध प्या हे नैसर्गिक स्लीप एइड म्हणून काम करतं.
3.झोपण्यासाठी शांत, अंधाराचं वातावरण तयार करा तेजस्वी प्रकाश आणि आवाज टाळा.
4.मोबाईल वापरणं थांबवा झोपण्याच्या किमान एक तास आधी फोन दूर ठेवा.
5.नियमित झोपेची वेळ पाळा रोज एकाच वेळी झोपणं आणि उठणं याने शरीराची झोपेची सवय सुधारते.
झोप ही शरीरासाठी ‘रिस्टार्ट बटण’सारखी असते. अपुऱ्या झोपेमुळे शरीराच्या प्रत्येक प्रणालीवर परिणाम होतो त्यात लैंगिक आरोग्यही अपवाद नाही. त्यामुळे दररोज किमान 7-8 तासांची झोप घेणं ही सवय नाही, तर आवश्यकता आहे.
Comments are closed.