बाहेर काही चर्चा असल्या तरी…, रोहित-विराटसोबतच्या नात्यावर शुभमन गिल मनमोकळेपणानं बोलला…


पर्थ: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका उद्यापासून सुरु होणार आहे. या मालिकेत भारताचं कर्णधारपद शुभमन गिलकडे देण्यात आलं आहे. अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतीय संघाचा भाग असतील. रोहित शर्मा आणि विराट कोहली चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पहिल्यांदा भारतीय संघाकडून खेळताना दिसणार आहे. या दोघांसोबत नातं कसं आहे, यावर शुभमन गिलनं भाष्य केलं आहे.

Shubman Gill on Rohit Sharma : शुभमन गिल रोहित शर्माबाबत काय म्हणाला?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर विराट कोहली आणि रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यातील संबंध बिघडल्याचे दावे केले जात होते. रोहित शर्मा आणि विराट कोहली  हे दोघे शुभमन गिलसोबत बोलत नाहीत, असा दावा देखील केला जात होता. यावर शुभमन गिलनं प्रतिक्रिया दिली आहे.  शुभमन गिल म्हणाला की रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासोबत संबंध पहिल्यासारखे मजबूत आहेत, अडचण आल्यास त्या दोघांचा सल्ला घेण्यास मागं पुढं पाहणार नाही, असं म्हटलं.

पर्थ वनडे पूर्वी स्वान नदी किनाऱ्यावर आयोजित पत्रकार परिषदेत शुभमन गिल म्हणाला की, “बाहेर काही चर्चा सुरु असल्या तरी रोहित शर्मा सोबत माझं नातं बदललं नाही. जेव्हा मला मदतीची गरज असेल तेव्हा तो नेहमीच उपलब्ध असतो. पिच संदर्भात काही माहिती घ्यायची असेल किंवा काहीही मी त्याला जाऊन विचारतो, तुम्हाला काय वाटतं, जर तुम्ही कर्णधार  असता तर काय केलं असतं. विराट भाई आणि रोहित भाई यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत, ते सल्ला देतात”, असं शुभमन गिल म्हणाला.

शुभमन गिल पुढं म्हणाला की, विराट भाई आणि रोहित भाईसोबत टीमला पुढं घेऊन जाण्यासंदर्भात खूप चर्चा केली आहे. ते कोणत्याही प्रकारे टीमला पुढं घेऊन जाऊ पाहत होते याचा अनुभव आणि धडा यामुळं आम्हाला खूप फायदा होईल. महेंद्रसिंह धोनी, विराट भाई, रोहित शर्मानं जो वारसा निर्माण केला आहे, त्यांचा अनुभव, कौशल्य टीमसाठी खूप महत्त्वाचा आहे, असं गिलनं म्हटलं.

शुभमन गिल म्हणाला की लहान असताना ते माझे आदर्श होते, ते ज्या प्रकारे खेळत होते आणि धावांची भूक होती, त्यातून खूप प्रेरणा मिळते.  या टीमचं कर्णधारपद भूषवणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या टीममध्ये महान खेळाडू आहेत, जेव्हा अडचण असेल तेव्हा त्यांचा सल्ला घेण्यात मागं राहणार  नाही. मी त्यांच्या कर्णधारपदात खेळताना खूप शिकलो आहे. मला त्याच प्रकारचा कर्णधार व्हायचं आहे.  माझ्या सर्व खेळाडूंना सुरक्षित वाटेल, स्पष्ट संवाद होईल, असं गिलनं म्हटलं. रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं जवळपास 20 वर्ष भारतीय क्रिकेटची सेवा केलीय, मी त्यांच्याकडून खूप शिकलोय,त्यांच्या अनुभवाची कोणती तुलना नाही,असंही गिलनं म्हटलं.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.