क्रिकेटनामा – रो-कोचा संग्राम सुरू!

>>
आजपासून रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी एक संग्राम सुरू होतोय! ‘त्यांच्यासाठी ही काही परीक्षा नाही. दोघांनीही स्वतःला सिद्ध केलेलं आहे. दोघंही पराक्रमी फलंदाज आहेत,’ असं निवड समितीचा अध्यक्ष अजित आगरकर ‘एनडीटीव्ही’च्या जागतिक शिखर परिषदेत नुकतंच म्हणालाय. पण हे उशिराने सुचलेलं शहाणपण दिसतंय. स्वतःला सिद्ध केलेल्या एका फलंदाजाला कप्तानपदावरून काढायचं अन् दुसऱ्याला म्हणायचं, देवधर स्पर्धा खेळ. एकदा म्हणायचं, भविष्याकडे आमचा डोळा आहे. मग देवधर स्पर्धेत उभरत्या खेळाडूंना संधी द्या आणि विश्वचषकासाठी अडीच वर्षे असतील तर कप्तानपद का काढून घेतलं! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वन डेसाठी ‘रो-को’ची निवड केल्यानंतर आगरकर आणि गौतम जोडीने जी काही परस्परविरोधी वक्तव्य केली ती पाहता ‘रो-को’साठी ही मालिका एखाद्या युद्धापेक्षा कमी नाही. सोयीसाठी ‘रो-को’च्या चालीवर या जोडीचं आपण ‘आगौ’ असं नामकरण करू! आगाऊ नाही!
‘आगौ’ तुमचं चुकलंच. आपल्याच सहकाऱ्यांशी सुसंवाद साधणं त्यांना नाही जमलं. दोन वर्षांनंतर होणाऱ्या स्पर्धेसाठी तुमचा विचार करणं कठीण आहे आणि यापुढे तुमची कामगिरी कशी होतेय याकडे आमचं बारीक लक्ष असेल असं स्पष्ट शब्दांत ‘रो-को’ला सांगण्याचा दम ‘आगौ’ एकवटू शकले नाहीत. एकदा म्हणायचं, संघनिवड माझा प्रांत नाही, निवड समितीला विचारा. दुसऱ्या श्वासात हर्षित राणाची निवड कशी निकषावर झाली याचं स्पष्टीकरण द्यायचं!
‘आगौ,’ तुमचं चुकलंच. संघाची निवड आम्ही कुठलाही भेदभाव न करता, आकस न ठेवता पूर्णपणे खेळाचं अनुमान बांधून केलेलं आहे असं ‘आगौ’ छातीठोकपणे का म्हणू शकत नाहीत हेच कळेनासं होऊन बसलंय! म्हणूनच आजपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेची सुरुवात पर्थला होत असताना छाती धाकधुक करतेय. या गदारोळामुळे ‘रो-को’वर दडपण येऊ शकतं. त्याचं नुकसान एकूण संघाला होऊ शकतं. याकडे ‘आगौ’चं लक्ष गेलेलं दिसत नाही.
ऑस्ट्रेलियचा दौरा सोपा कधीच नसतो याची जाण ‘आगौ’ला नसेल असं म्हणता येणार नाही. खेळपट्ट्यांपासून बॅटपर्यंत सगळं बदलतं. खेळण्याचं, विचार करण्याचं तंत्रसुद्धा बदलतं… ‘रो-को,’ दोघंही लढवय्ये आहेत. अनेक युद्ध त्यांनी लढली आहेत, जिंकली आहेत. हा संग्रामसुद्धा ते पादाक्रांत करतील अशी आशा!
Comments are closed.