मतदार यादीतील घोळावरून राज्य निवडणूक आयोगाची सारवासारव, घर क्रमांक नसल्याचे खापर पालिकेवर फोडले

मतदार याद्यांमधील घोळ आणि लपवाछपवीचा घोळ विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जगजाहीर केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. मतदार यादीमध्ये एकाच व्यक्तीचे नाव अनेकदा असल्यास किंवा मतदार याद्यांमधील तपशिलात सुधारणा करण्याबाबत मतदारसंघाच्या नोंदणी अधिकाऱयाकडे अर्ज केल्यास त्यावर निवडणूक अधिकारी निर्णय घेतील, असे स्पष्ट करीत बुथ लेव्हल अधिकारी नेमण्याचा सल्ला राजकीय पक्षांना दिला आहे.
विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांची भेट घेतल्यानंतर आता मतदार याद्यांच्या संदर्भात मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हाधिकाऱयांकडून आलेल्या अहवालाच्या आधारावर मुख्य निवडणूक अधिकाऱयांनी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंत अद्ययावत असलेली मतदार यादी उपलब्ध करून दिली आहे. ही यादी दावे आणि हरकतींसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे असे म्हटले आहे.
मतदारांच्या चुकीमुळे घर क्रमांक नाही
अमरावती येथील मतदान केंद्र क्रमांक 211 येथील यशोदा नगर आणि उत्तम नगरातील झोपडपट्टी भाग व पाल टाकून वास्तवास असलेले मतदार राहतात. या झोपडपट्टींना महापालिकांकडून घर क्रमांक देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या नावासमोर घर क्रमांक नमूद नाही. त्याव्यतिरिक्त अन्य काही ठिकाणीही घर क्रमांक नसणे किंवा मतदारांनी अर्ज करताना चुकीचा घर क्रमांक टाकल्यामुळे अशा बाबी समोर येत असल्याचा दावा आयोगाने केला आहे.
नावे वगळली
दोन मतदारांची नावे एकापेक्षा अधिक वेळा मतदार यादीमध्ये समाविष्ट केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यावर ही नावे पूर्वीच वगळण्यात आल्याचे सांगण्यात आले.
Comments are closed.