लाखोंचे बक्षीस असलेला नक्षलवादी नेता अटक
छत्तीसगड पोलिसांना मोठे यश ; मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त
► वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. कोंटा पोलीस आणि सीआरपीएफ 218 व्या बटालियनने केलेल्या संयुक्त कारवाईत पोलिसांनी 1 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या मुचाकी मंगा याला अटक केली. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला संशयित हा बेज्जी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या किंडरेलपाड गावचा रहिवासी आहे. तो गेल्या पाच वर्षांपासून कोंटा एरिया कमिटी अंतर्गत एलओएस सदस्य म्हणून सक्रिय होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अखेरीस तो शनिवारी सुरक्षा दलाच्या जाळ्यात सापडला आहे.
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी गेल्या आठवड्यापासून नक्षलविरोधी मोहीम तीव्र केल्यानंतर 200 हून अधिक जणांनी शरणागती पत्करली आहे. नक्षलवाद्यांचे अनेक गट मुख्य प्रवाहात येत असले तरी काही नक्षलवादी अद्यापही आपल्या पुर्वीच्या पवित्र्यावर ठाम असल्यामुळे त्यांच्यावर सुरक्षा दलांकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईदरम्यानच मुचाकी मंगा याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
Comments are closed.