रुग्णावर चुकीचे उपचार; मृतदेह लपवून ठेवला! अहिल्यानगरातील न्यूक्लियस हॉस्पिटलसह 6 डॉक्टरांवर गुन्हा

रुग्णावर चुकीचे उपचार करणे, मृत्यूनंतर त्याचा मृतदेह लपवून ठेवणे अशा थरकाप उडवणाऱ्या प्रकरणात अखेर छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानंतर अहिल्यानगर शहरातील न्यूक्लियस हॉस्पिटलसह सहा नामांकित डॉक्टरांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यूक्लियस हॉस्पिटलचे डॉ. गोपाळ बहुरूपी, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. मुकुंद कांबळे, डॉ. हर्षदीप झावरे, डॉ. सचिन पांडुळे, तसेच विखे-पाटील मेमोरियल लॅब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

अहिल्यानगर शहरातील सावेडीतील 65 वर्षीय बबन घोरताळे यांना घशाचा किरकोळ त्रास होत असल्याने ते डॉ. सचिन पांडुळे यांच्या दवाखान्यात गेले होते. तेथे त्यांच्या सर्व तपासण्या निगेटिव्ह आल्या असतानाही डॉ. पांडुळे यांनी ‘एक दिवस हॉस्पिटलमध्ये राहा,’ असा सल्ला देत घोरताळे यांना न्यूक्लियस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. त्यानंतर सुरू झाला थरकाप उडवणारा ‘उपचार प्रयोग’! कोणताही गंभीर त्रास नसताना रुग्णाच्या शरीरातील रक्त काढून घेण्यात आले. तसेच कोविड नसतानाही तब्बल पाच ‘रेमडेसिव्हिर’ इंजेक्शन्स देण्यात आली. रक्त काढताना रुग्णाला बांधून ठेवण्यात आले होते, असा आरोप मृत बबन घोरताळे यांचा मुलगा अशोक घोरताळे यांनी केला आहे.

वडिलांवर चुकीचे उपचार होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हॉस्पिटलकडे तपासणी अहवाल मागितला. मात्र, रिपोर्ट लपवण्यात आले. त्यानंतर चार दिवसांनी डॉक्टरांनी रुग्णाच्या मृत्यूची माहिती दिली. मात्र, मृतदेह दाखविण्यास नकार देत तो सिव्हिलला पाठवला, असे सांगितले. मात्र, याबाबत सिव्हिल रुग्णालयात कोणतीही नोंद नव्हती.

या संशयास्पद प्रकारानंतर अभय घोरताळे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, तेथे कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायालयाने या प्रकरणाची सखोल सुनावणी करून संबंधित डॉक्टरांचा हलगर्जीपणा आणि फसवणुकीवर ठपका ठेवत तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या आदेशानंतर आज तोफखाना पोलिसांनी हॉस्पिटलसह सहा नामांकित डॉक्टर आणि एका लॅबविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान, यासंदर्भात तोफखाना पोलिसांशी संपर्क साधला असता, याप्रकरणी आज गुन्हा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

Comments are closed.