सी कोचमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग : अनेक गाड्या प्रभावित

एसी कोचमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग : अनेक गाड्यांवर परिणाम

वृत्तसंस्था/ अमृतसर

पंजाबमधील अमृतसरहून बिहारमधील सहरसाला जाणाऱ्या गरीब रथ एक्स्प्रेस रेल्वेला शनिवारी सकाळी 7:15 च्या सुमारास आग लागली. एसी कोचमध्ये लागलेल्या आगीत तीन डबे जळून खाक झाले आहेत. या डब्यांमधून 125 जण प्रवास करत होते. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत तीन जनरल एसी कोच जळून खाक झाले. तसेच प्रवाशांचे साहित्यही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. एक्स्प्रेस रेल्वे पंजाबमधील सरहिंद जंक्शननजीक पोहोचली असताना ही घटना घडली. प्राथमिक निष्कर्षांवरून आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

अमृतसरहून निघालेल्या गरीब रथ एक्स्प्रेसच्या तीन एसी जनरल कोचमध्ये शनिवारी सकाळी आग लागली. सकाळी 7:22 वाजता ही ट्रेन सरहिंद रेल्वे जंक्शन ओलांडत असताना कोच क्रमांक 19 मधून धूर येताना दिसला. सरहिंद जंक्शनच्या बाहेरील बाजूस असलेल्या ब्राह्मण माजरा उ•ाणपुलाखाली ट्रेन ताबडतोब थांबवण्यात आली. तोपर्यंत कोच क्रमांक 19 मधील आगीने 18 आणि 20 क्रमांकाच्या कोचना अंशत: वेढले होते. तीन डबे आणि आग लागलेल्या जनरेटर कारला वेगळे केल्यानंतर सरहिंदहून ट्रेन रवाना करण्यात आली.

अग्निशमन दल घटनास्थळी

अग्निशमन दल येण्यापूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवासी आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सरहिंद अग्निशमन दलाला  7:36 वाजता आगीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी दोन गाड्या पाठवल्या. तसेच मंडी गोविंदगड येथून अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. सुमारे साडेतीन तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. या दुर्घटनेत प्रवाशांचे सामान जळून खाक झाले. या एक्स्प्रेसमध्ये दिवाळी आणि छठपूजेसाठी बिहारमधील त्यांच्या घरी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती.

तीन डब्यांमध्ये 125 प्रवासी

आग लागलेल्या तीन डब्यांमध्ये 125 प्रवासी होते. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. तथापि, बिहारमधील छपरा जिह्यातील सदवाही येथील जिरा देवी नावाची एक महिला होरपळली. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला राजपुरा येथील एका खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आले. ट्रेनमध्ये आग लागल्याची माहिती मिळताच अंबाला डिव्हिजनचे डीआरएम विनोद भाटिया यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. डीआरएमनी तात्काळ चौकशीचे आदेशही जारी केले आहेत.

Comments are closed.