शनिवार ठरला अपघात वार, कणकवलीत कार-दुचाकी अपघातात व्यापाऱ्याचा मृत्यू

मुंबईहून बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार चंद्रकांत कृष्णाजी फोंडके (६८, रा. फोंडाघाट) हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात आणत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील तळेरे येथील दळवी कॉलेज समोरील शिडवणे फाटा येथे शनिवार दुपारच्या सुमारास घडला. या प्रकरणी कारचालक हेमंत सुरेश रेमाणाचे (३२, रा. बेळगाव, कर्नाटक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंद्रकांत फोंडके हे होलसेल व्यापारी होते. शनिवारी ते फोंडाघाट येथून तळेरे येथील व्यापाऱ्याकडून मालाचे पैसे आणण्यासाठी दुचाकी घेऊन गेले होते. वसुली करून मुंबई-गोवा महामार्गावरून फोंडाघाटकडे येत असताना कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात ते जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणत असतानाच त्यांचा वाटेत मृत्यू झाला. याबाबत दिलीप भिकाजी फोंडके यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
दुचाकीची बसला धडक
शनिवारी मुंबई-गोवा माहामार्गावर उभ्या असलेल्या एका खासगी बसला दुचाकीस्वाराने मागाहून धडक दिली. यात दुचाकीस्वार सुरेश संतोष मुगणेकर (२३, रा. बळणे-वरचवाडी) हा जखमी झाला. हा अपघात बेळणे येथे झाला.
अवजड वाहनाची कारला धडक
मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कारला अवजड वाहनाने धडक दिली. या अपघातात कारचा टायर फुटला. अपघातात कोणतीही जीवितहानी झाली. मात्र, कारचे नुकसान झाले. अपघातांची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
Comments are closed.