दिवाळीत काजू, बदाम, मनुके खाताय… सावधान ! एपीएमसीत भेसळ; मसाला मार्केटमध्ये एफडीएचा छापा

दिवाळीच्या कालावधीत तुम्ही जर सुकामेव्याचा आस्वाद घेत असाल तर तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. निकृष्ट दर्जाचा सुकामेवा आकर्षक दिसावा आणि चढ्या दराने विकला जावा यासाठी काजू, बदाम, मनुके केमिकलमध्ये बुडवून नंतर रंगवले जात आहेत. आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेला हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) एपीएमसीच्या मसाला मार्केटमधील एक गाळा सील केला आहे.

एपीएमसीमध्ये सर्वाधिक मलईदार मार्केट म्हणून ओळख असलेल्या मसाला मार्केटमधील गाळा क्रमांक जी-७ मध्ये काजू, बदाम आणि मनुक्यांमध्ये भेसळ होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी रश्मी वंजारी यांनी अंबिका ड्रायफ्रूट या दुकानावर छापा मारला. त्यावेळी तेथे हा भेसळयुक्त सुकामेवा आढळून आला.

अंबिका ड्रायफ्रूट या दुकानात निकृष्ट दर्जाचे बदाम आणि काजू यांचा स्वाद वाढवण्यासाठी भट्टीत ठेवले जात होते. आकर्षक दिसावे यासाठी त्यांच्यावर पावडरही टाकली जात होती. मनुक्यांना रासायनिक द्रव्यात बुडवून नंतर त्यांना रंग दिला जात होता. अशी माहिती एफडीएचे सहाय्यक आयुक्त योगेश ढाणे यांनी दिली.

Comments are closed.