Diwali : नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी कारिट पायाने का फोडायचे असते?

दिवाळीतील पहिला दिवस म्हणजे ‘नरक चतुर्दशी’. अश्विन कृष्ण चतुर्दशीला ‘नरक चतुर्दशी’ असे म्हणतात. या दिवशी दिवाळीची पहिली आंघोळ म्हणजे अभ्यंग स्नान केले जाते. शुचिर्भूत होऊन विधिवत पूजा करुन कारिट पायाने फोडले जातात. तुम्ही कधी विचार केला आहे का की, नरक चतुर्दशीलाच कारिट का फोडतात? यामागील कारण काय असेल? चला जाणून घेऊयात उत्तर

का फोडतात हे फळ?

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अभ्यंगस्नान केल्यानंतर कारिट हे कडवे फळ फोडण्याची परंपरा आहे. हे फळ नरकासुर राक्षसाच्या कडवटपणाचे आणि दुष्ट शक्तींचे प्रतीक मानले जाते. पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नानानंतर घराबाहेर किंवा तुळशी वृदांवनाजवळ कारिट फळ डाव्या पायाच्या अंगठ्याने चिरडले जाते. कारिट फोडून त्याचा रस जिभेला लावला जातो आणि 2 बिया डोक्याला लावल्या जातात. खरं तर, एका अर्थाने त्या रुपात आपल्या मनातील सारी कटुता, दुष्टतेचा नाश केला जातो. हे नरकासुराच्या कडवटपणावर आणि दुष्टपणावर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक आहे, असे मानले जाते. या परंपरेतून नकारात्मकता दूर करण्याची आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणण्याची भावना व्यक्त केली जाते.

हेही वाचा –Happy Diwali 2025 Wishes: ‘नक्षत्रांची करीत उधळण दिवाळी ही आली’; प्रियजनांना पाठवा शुभेच्छा !

यामागील कथा –

प्राग्ज्योतिषपूर नगरीचा एक राजा होता ज्याचे नाव नरकासूर. त्याला भूदेवीकडून वैष्णवास्त्र प्राप्त झाले होते. त्यामुळे तो फार बलाढ्य झाला होता आणि देवीदेवतांना त्रास देऊ लागला. त्याने इंद्राचा ऐरावत हत्ती आणि घोडाही हरण केला. काहींना तुरुंगात डांबले तर काहींची संपत्ती लुटली. त्याच्या या अत्याचाराला सगळे देवीदेवता त्रासून गेले होते. नराकासुराचा हा संहार पाहून इंद्राने कृष्णाला मदतीसाठी येण्याची विनंती केली. कृष्णाने या विनंतीचा मान ठेवत नरकासुराचा अंत करण्याचे आव्हान स्विकारले.

कृष्णाने गरुडावर स्वार होत प्राग्ज्योतिषपूरावर स्वारी केली. त्याने नरकासुराचे दोन तुकडे केले आणि बंदिखान्यातील देवीदेवतांनाही सोडवले. या कैदेत पृथ्वीवरील अनेक राजांच्या एकूण सोळा हजार कन्यांनाही डांबण्यात आले होते. नरकासुराच्या कैदेतील या कन्यांना त्यांचे नातेवाईक स्विकारण्यास तयार नाहीत हे पाहून कृष्णाने त्या सर्व कन्यांशी विवाह केला.

मरत असताना नरकासुराने कृष्णाकडे आशीर्वाद मागितला की ‘माझा मृत्यूदिन सर्वत्र दिवे लावून साजरा केला जावा आणि यादिवशी जो मंगल स्नान करेल त्याला नरक भोगावा लागू नये.” कृष्णाने यावर “तथास्तु” म्हटले. तेव्हापासून श्रीकृष्णाचा विजयोत्सव आणि नरकासुराचा वध हा दिवे लावून साजरा केला जातो.

हेही वाचा – Yamdeepdaan 2025: दिवाळीत यमदीपदानाला विशेष महत्त्व; जाणून घ्या योग्य पद्धत

Comments are closed.