महामार्गावरील रखडलेल्या पुलाच्या कामाने घेतला वेग, गर्डर चढवण्याचे काम सुरू

रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम पाऊस थांबल्याने आता वेग घेत आहे. चिपळूण शहरात काल काही ठिकाणी वाहतूक वळवून 40 टनी गर्डर उड्डाण पुलावर चढवण्याचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत 400 गर्डर चढविण्यात आले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाची नवीन डेडलाईन ही सातत्याने देण्यात येते. 2026 पर्यंत हे काम पूर्ण होईल असे अंदाज सांगण्यात आले आहेत. पूर्ण झालेल्या महामार्गावरील खड्डे हे तर दररोज वाढत आहेत. भोस्ते सारखे छोटे घाट देखिल अपघाताचे ब्लॅक स्पॉट बनले आहेत. महामार्गावरील खड्ड्यांची वाढती संख्या ही दुचाकी अपघातांसाठी आमंत्रण ठरली आहे. या साऱ्यामुळे मुंबई गोवा हे काम कधी पूर्ण होणार याविषयी सातत्याने विचारणा होत आहे. देशभरातील महामार्गाचे काम वेगाने पूर्ण झाले. यामुळे चौदा वर्षां पूर्वी मुंबई गोवा हा महामार्ग क्रमांक 17 असताना प्रलंबित आणि मग पुढे जाऊन रखडलेल्या या महामार्गाचा आता देशात 66 वा क्रमांक लागतो. एकूणच कोकणकडे बघण्याचा आणि इथे काम करण्याचा दृष्टिकोन हा पूर्वग्रह दूषित असल्याने हे काम रखडवण्यात आले आहे काय ? असा प्रश्न या निमित्ताने विचारण्यात येत आहे.
दरम्यान चिपळूण शहरामध्ये उड्डाणपूल हा गेल्या दोन वर्षांपासूनच चर्चेत आहे. बहादूरशेख येथे गर्डर कोसळल्याने या एकूणच कामाच्या दर्जा विषयी शंका निर्माण झाली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर आता उड्डाण पुलावर गर्डर चढवण्याच्या कामाने वेग घेतला आहे. आतापर्यंत 400 गर्डर चढवून झाले आहेत. तर अजून तेवढेच गर्डर चढवण्याचे काम प्रलंबित आहे. यासाठी 1500 टनी व 1000 टनी असे दोन क्रेन कामाला जुंपण्यात आले आहेत. प्रत्येक गर्डर हा 40 टनी वजनाचा असल्याचे सांगण्यात आले.
Comments are closed.