शुभमन गिल पहिल्याच परीक्षेत नापास, विराट-रोहित असतानाही ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला लोळवलं


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला वनडे : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात पावसाने बऱ्याचदा अडथळा आणला, ज्यामुळे षटकांची संख्या 50 वरून 26 करण्यात आली. या कमी षटकांच्या सामन्यात भारतीय फलंदाज पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी करताना दिसले. भारताने प्रथम फलंदाजी करत 9 बाद 136 धावा केल्या, मात्र डकवर्थ-लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियासमोर 131 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. हे लक्ष्य कांगारूंनी सहज पार करत 7 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

ऑस्ट्रेलियासमोर टॉप-मिडल ऑर्डरचे सगळे फलंदाज फेल

सामन्यापूर्वी टीम इंडियाचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतले होते, परंतु दोघांचीही कामगिरी निराशाजनक ठरली. रोहितने केवळ 8 धावा केल्या, तर विराट कोहलीला खातेही उघडता आले नाही. शुभमन गिलही फक्त 10 धावांवर माघारी फिरला. चाहत्यांना रोहित आणि विराटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण दोघेही ती पूर्ण करू शकले नाहीत. या धक्क्यातून टीम इंडिया अखेरपर्यंत सावरू शकली नाही.

विकेटकिपर के. एल. राहुल आणि अष्टपैलू अक्षर पटेल यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. राहुलने 31 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 38 धावा केल्या, तर अक्षर पटेलनं 38 चेंडूत 3 चौकारांसह 31 धावा केल्या. शेवटी आपला पहिला वनडे सामना खेळणाऱ्या अष्टपैलू नीतीश कुमार रेड्डीनं फक्त 11 चेंडूत 2 षटकारांच्या मदतीनं नाबाद 19 धावा झळकावल्या. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूड, मिचेल ओवेन आणि मॅथ्यू कुहनेमन यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले, तर मिचेल स्टार्क आणि नॅथन एलिस यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

मिचेल मार्शची तुफानी फटकेबाजी अन् टीम इंडियाचा पराभव

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या मिचेल मार्शने दमदार फलंदाजी केली आणि शेवटपर्यंत मैदानात टिकून राहिला. मात्र, तो अर्धशतकाच्या उंबरठ्यावर थांबला. त्याने 52 चेंडूंमध्ये दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 46 धावा केल्या. मार्शव्यतिरिक्त जोश फिलिपने 37 धावा तर मॅट रेनशॉने नाबाद 21 धावा जोडल्या. ट्रॅव्हिस हेड आणि मॅथ्यू शॉर्ट यांनी प्रत्येकी आठ धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतला.

हे ही वाचा –

Virat Kohli: विराट कोहली भारताऐवजी लंडनमध्ये का गेला राहायला? त्याने स्वतः ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान सांगून टाकलं

आणखी वाचा

Comments are closed.