शुबमन गिलचं कर्णधार म्हणून पदार्पण अपयशी, ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या वनडे पराभवानंतर लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद!

ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाची सुरवात चांगली झाली नाही. कांगारू संघाने शुबमन गिलच्या (AUSTRALIA BEAT INDIA IN THE 1ST ODI.) संघाला सहजपणे 7 गडी राखून पराभूत केले. भारतीय संघाने दिलेले 131 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने केवळ 21.1 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण केले.

फलंदाजीत काही खास कामगिरी न करणाऱ्या शुबमन गिलचं नेतृत्व देखील साधारणच दिसलं. पर्थमध्ये मिळालेल्या या पराभवाने गिलच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम नोंदला गेला. हा सामना शुबमन गिलचा वनडे कर्णधार म्हणून पहिलाच सामना होता, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.

याआधी गिलने टी-20 आणि कसोटी सामन्यांतही आपला पहिला सामना कर्णधार म्हणून गमावला होता. अशा प्रकारे तीनही फॉरमॅटमध्ये पहिला सामना हरलेला तो फक्त दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर होता. पर्थमध्ये झालेला हा पराभव 2025 मध्ये भारताचा एकदिवसीय फॉरमॅटमधील पहिलाच पराभव आहे. यामुळे टीम इंडियाचा सलग 8 विजयांचा विजयरथही थांबला.

भारतीय फलंदाजांचं प्रदर्शन पर्थमधील पहिल्या वनडेत अत्यंत निराशाजनक राहिलं. डावाची सुरुवात करणारा शुबमन गिल आणि रोहित शर्मा दोघेही फ्लॉप ठरले. रोहित फक्त 8 धावांवर बाद झाला, तर गिल 10 धावांवर माघारी परतला. विराट कोहली तर खातेही उघडू शकला नाही. श्रेयस अय्यरनेही निराशा केली आणि 24 चेंडूत केवळ 11 धावा करून तो बाद झाला.

अक्षर पटेल आणि के. एल. राहुल यांनी मात्र डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अक्षरने 38 धावा केल्या पण तो कुहनेमनच्या फिरकीत अडकला. राहुलनेही 31 चेंडूत 38 धावा करत फलंदाजी केली पण तोही बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरने फक्त 10 धावा केल्या. अखेरच्या षटकात नीतीश कुमार रेड्डीने दोन षटकार ठोकत संघाला 136 धावांपर्यंत पोहोचवले. नीतीश 11 चेंडूत 19 धावा करून नाबाद राहिला.

Comments are closed.