राज्यात 96 लाख खोटे मतदार! राज ठाकरे यांचा इशारा… मतदार यादी स्वच्छ होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा

महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे. त्यात तब्बल 96 लाख बोगस मतदार आहेत. मतदार यादीत जोपर्यंत सुधारणा होत नाही, सर्व राजकीय पक्षांचे जोपर्यंत समाधान होत नाही, तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा, असे जाहीर आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज निवडणूक आयोगाला दिले. महाराष्ट्रातील निवडणुका शांतपणे पार पाडायच्या असतील तर पहिले मतदार यादी स्वच्छ करा, जो खरा मतदार आहे त्याला मतदान करू द्या, असेही राज ठाकरे यांनी या वेळी आयोगाला बजावले.

गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आज मनसेचा मेळावा झाला. सर्व याद्या नीट पाहा, कुठे कुठे या लोकांनी शेण खाल्लेय ते पहा, असे आदेश या वेळी राज ठाकरे यांनी मनसेच्या मतदार यादी प्रमुखांना दिले. सर्वच पक्षांनी हे केले पाहिजे आणि जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, असे आमचे निवडणूक आयोगाला स्पष्ट म्हणणे आहे. पण निवडणुका घेण्यासाठी जी घाई सुरू आहे ती घोटाळा करण्यासाठीच आहे, असे राज ठाकरे म्हणाले. या वेळी त्यांनी अजित पवार गटाचे सतीश चव्हाण, एकनाथ शिंदे गटाचे संजय गायकवाड आणि भाजपच्या मंदा म्हात्रे या सत्ताधारी आमदारांचे बोगस मतदार नोंदणीसंदर्भातील व्हिडियोही दाखवले.

जेवढं म्हणून तुमचं अस्तित्व आहे ते सगळं हे मिटवायला निघाले आहेत. भाजपला जे मराठी लोक मतदान करताहेत त्यांनाही सांगायचं आहे, हा अदानी, अंबानीचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरेल तेव्हा तुम्हाला ते बघणार नाहीत. तुम्हालाही त्या वरवंटय़ाखाली मराठी म्हणूनच ते घेणार, असा सावधगिरीचा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

लाव रे तो व्हिडिओ… मोदींची क्लिप दाखवत निवडणूक आयोगाला सवाल

मोदींचे मुख्यमंत्री असतानाचे भाषण या वेळी राज ठाकरे यांनी दाखवले. निष्पक्ष निवडणुका घेणे हे आयोगाचे कर्तव्य. खुर्चीत ज्याने बसवलं त्या मालकाच्या मर्जीनुसार आयोग काम करू शकत नाही. लोकशाहीत हे मान्य नाही, असे मोदी म्हणाले होते. त्यावर बोट ठेवत मग मी वेगळं काय सांगतोय, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

भाजपची मॅच फिक्सिंग झालीय

देशात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपला आता मुंबई महापालिकाही हवी आहे. मतदार याद्यांमध्ये खोटी नावे भरून भाजपला निवडणुकांना सामोरे जायचे आहे. कुणी मतदान करो वा न करो, भाजपचे मॅच फिक्सिंग झालेले आहे. हा मतदारांचा अपमान आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

मुंबई अदानी-अंबानीच्या घशात घालू देणार नाही

भाजपला हा संपूर्ण महाराष्ट्र, मुंबईसह सगळी शहरं अदानी-अंबानीला आंदण म्हणून द्यायची आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ अदानींच्या हाती आहे. तिथून सर्व कार्गो वाढवणला न्यायचा, वाहतूक हळूहळू नवी मुंबईला न्यायची आणि त्यानंतर मुंबई विमानतळाची जमीन अदानींच्या घशात घालायची असा सगळा प्लॅन आहे. पण काहीही झाले तरी मुंबई अदानी-अंबानीच्या घशात घालू देणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

Comments are closed.