उमेदवारीसाठी २.७ कोटींची मागणी

राबडीदेवींच्या निवासस्थानाबाहेर कपडे फाडून रडू लागला राजद नेता

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहारमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान राजकीय वातावरण तापले आहे. एकीकडे रालोआत सामील सर्व पक्षांदरम्यान जागावाटप झाले आहे, तर दुसरीकडे महाआघाडीचे प्रमुख घटक पक्ष राजद आणि काँग्रेसमध्ये तिकीटवाटपावरून अद्याप ओढाताण सुरू आहे. याचदरम्यान पाटण्यातील एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मधुबन मतदारसंघाची उमेदवारी न मिळाल्याने राजदचा एक नेता राबडीदेवींच्या निवासस्थानाबाहेर कुर्ता फाडून रडू लागला. मदन शाह यांनी यादरम्यान संजय यादव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राजद नेते संजय  यादव यांनी उमेदवारीसाठी 2.7 कोटी रुपयांची मागणी केली होती. मी रक्कम देण्यास नकार दिल्याने पक्षाचे तिकीट अन्य नेत्याला देण्यात आल्याचा आरोप मदन शाह यांनी केला आहे.

संजय यादव हे राजद नेते तेजस्वी यादव यांचे निकटवर्तीय मानले जातात. संजय यादव यांच्यावरून तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांच्यात दुरावा झाल्याचे मानले जाते. तर लालूप्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी यादव यांनीही संजय यादव यांच्यावर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केले होते. संजय यादव यांच्यामुळेच लालूप्रसाद यादव यांच्या परिवारात कलह होत असल्याची चर्चा सुरू आहे.

राजद प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते असा दावा मदन शाह यांनी केला आहे. 2020 च्या निवडणुकीत मदन शाह यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती, परंतु त्यावेळी त्यांना 10 हजार मतांनी पराभव पत्करावा लागला होता. यावेळीही पक्षाकडून उमेदवारी मिळेल या आशेने ते सातत्याने पाटण्यात ठाण मांडून होते, परंतु यंदाच्या निवडणुकीकरता पक्षाने अन्य नेत्याला संधी दिल्याने मदन शाह हे नाराज होत स्वत:चा कुर्ता फाडून रडू लागले होते.

 

Comments are closed.