भारताने पहिले स्वदेशी प्रतिजैविक विकसित केले
जीवघेण्या संक्रमणावर प्रभावी : कॅन्सर अन् मधुमेहाच्या रुग्णांसाठी गूड न्यूज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताने एक मोठे यश मिळविले आहे. देशाने स्वत:चे पहिले स्वदेशी एंटीबायोटिक नॅफिथ्रोमायसिन तयार केले असून ते जीवघेण्या श्वसन संक्रमणांशी लढण्यास अत्यंत प्रभावी आहे. हे खासकरून कॅन्सरचे रुग्ण आणि अनियंत्रित मधुमेह असलेल्या लोकांसाठी एक आशेचा किरण आहे.
या एंटीबायोटिकला पूर्णपो भारतातच विकसित करण्यात आले असून त्यावरील वैद्यकीय परीक्षणही देशातच करण्यात आले आहे. भारताला औषध क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने हे एक अत्यंत मोठे पाऊल असल्याचे उद्गार केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी काढले आहेत.
नॅफिथ्रोमायसिन अशा श्वसन संक्रमणांशी लढण्यास सक्षम आहे, ज्यांच्या विरोधात वर्तमान एंटीबायोटिक्स उपयुक्त ठरत नाहीत. रोगप्रतिकारकक्षमता कमकुवत असलेल्या रुग्णांकरता नॅफिथ्रोमायसिन अत्यंत सहाय्यभूत ठरणार आहे. यात कॅन्सरचे रुग्ण आणि अनियंत्रित मधुमेहाने पीडित लोक सामील आहेत. या एंटीबायोटिकचा विकास भारताच्या औषधनिर्मिती क्षेत्राला आणखी मजबूत करेल आणि आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देणार असल्याचे डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे.
भारताने 10 हजारांहून अधिक ह्युमन जीनोम (मानवी शरीराची आनुवांशिक माहिती)चे सीक्वेंसिंग पूर्ण केले आहे. आता हे प्रमाण वाढवून 10 लाखापर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. जेनेटिक रिसर्चच्या क्षेत्रात ही एक मोठी प्रगती आहे. जीन थेरेपीच्या एका परीक्षणात 60-70 टक्क्यांपर्यंत सुधारणा दिसून आली आणि रक्तस्राव सारखी कुठलीच समस्या उद्भवली नाही. हे भारताच्या वैद्यकीय संशोधनासाठी अत्यंत मोठे यश असल्याचे जितेंद्र सिंह यांनी नमूद केले आहे.
या अँटीबायोटिकशी निगडित महत्त्वपूर्ण माहिती जगातील प्रतिष्ठित नियतकालिक ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन’मध्ये प्रकाशित झाली आहे. भारत जैववैद्यकीय नवोन्मेषात किती वेगाने प्रगती करतोय हे यातून दिसून येते.
50 हजार कोटीचे बजेट
डॉ. सिंह यांनी ‘अनुसंधान राष्ट्रीय अनुसंधान फौंडेशन’ला (एएनआरएफ) या दिशेने एक अत्यंत मोठे पाऊल ठरविले. या फौंडेशनसाठी पुढील 5 वर्षांमध्ये एकूण 50 हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे. यातील 36 हजार कोटी रुपये बिगर-शासकीय स्रोतांकडून येणार आहेत. हे देशात संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी एक मजबूत आर्थिक सहाय्य ठरेल असे डॉ. सिंह म्हणाले.
Comments are closed.