बिहार निवडणुकीत सूर्यवंशीची एन्ट्री! मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर क्रिकेटपटूने लोकांना केलं आवाहन
वैभव सूर्यवंशी बिहार निवडणूक 2025 : वैभव सूर्यवंशी… अवघ्या 14 वर्षांच्या बिहारच्या या पठ्ठ्यानं 2025 चा आयपीएल सीझन गाजवला. राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या वैभवनं फक्त सात सामने खेळले आणि 252 धावा फटकावल्या. त्यात एक शतक आणि एक अर्धशतक. त्यामुळे अवघ्या क्रिकेटविश्वाची या कोवळ्या मुलाकडे नजर वळली. त्यानंतर त्याने अंडर-19 संघात शानदार कामगिरी केली. दरम्यान आता त्याला बिहार निवडणुकीत एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
बिहारचा असलेला वैभव सूर्यवंशी केवळ 14 वर्षांचा असला तरी त्याने क्रिकेटविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 2025 मध्ये त्याने राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल पदार्पण केले आणि स्पर्धेच्या इतिहासातील दुसरे सर्वात जलद शतक झळकावले. त्यानंतर अंडर-19 संघासोबत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यांवर चांगली कामगिरी केली. पुढे रणजी ट्रॉफीत बिहार संघाचा उपकर्णधार बनला आणि आता त्याला बिहार निवडणुकीत एक महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने बिहार विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने लोकांना, विशेषतः तरुणांना मतदानाबाबत जागरूक करण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. यासाठी 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याला “फ्युचर व्होटर आयकॉन” म्हणून नियुक्त केले आहे. आयोगाच्या अधिकृत सोशल मीडियावर वैभवचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यात त्याने बिहारमधील जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
🏏 जसे वैभव सूर्यवंशीने देशासाठी षटकार ठोकले – या हंगामात, #बिहारमतदार मतदान करून विजयी फटके मारतील!
चॅम्पियनचा कॉल ऐका – बाहेर पडा आणि मतदान करा #YouAreTheOne 🫵#बिहार निवडणूक २०२५ pic.twitter.com/doVQiNZULy
— भारतीय निवडणूक आयोग (@ECISVEEP) 19 ऑक्टोबर 2025
बिहार विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत. पहिला टप्पा 6 नोव्हेंबरला आणि दुसरा टप्पा 11 नोव्हेंबरला होणार आहे. मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि विशेषतः नवमतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आयोग विविध क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींना आयकॉन म्हणून निवडतो. यंदा तरुण मतदारांना प्रेरित करण्यासाठी वैभव सूर्यवंशीची निवड करण्यात आली आहे.
बिहारमधील नागरिकांना आवाहन करताना वैभव म्हणाला की, आपल्या सर्वांना नमस्कार! मी मैदानावर उतरतो तेव्हा माझं काम असतं चांगलं खेळणं आणि माझ्या संघाला जिंकवणं. त्याचप्रमाणे लोकशाहीच्या मैदानात तुमचं काम आहे मतदान करणं. म्हणून जागरूक नागरिक बना आणि विधानसभा निवडणुकीत नक्की मतदान करा.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.