हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ नृत्यांगना मधुमती

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्यांगना मधुमती यांचे नुकतेच 15 ऑक्टोबर रोजी निधन झालं. मधुमती या त्यांच्या उत्तम नृत्यासाठी ओळखल्या जायच्या आणि त्यांची तुलना थेट दिग्गज अभिनेत्री हेलन यांच्याशी केली जात होती. भरतनाट्यम, कथक, मणिपुरी आणि कथकली या शास्त्रीय नृत्य प्रकारांचे त्यांनी सखोल प्रशिक्षण घेतले होतं.

मधुमती यांचा जन्म 1938 मध्ये महाराष्ट्रातील एका छोट्या गावात पारशी कुटुंबात झाला होता. लहानपणापासूनच त्यांना नृत्याची आवड होती. त्यांना शिक्षणापेक्षा जास्त नृत्यात रस होता. त्यामुळे त्यांनी वडिलांकडे नृत्य शिकण्यासाठी हट्ट केला. त्यांनी 1957 साली एका मराठी चित्रपटात डान्सर म्हणूनच अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली. पण, काही कारणास्तव तो चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.

हेही वाचा – Celebrity Couple First Diwali: कलाविश्वातील या जोडप्यांची यंदा पहिली दिवाळी

नृत्य हे ‘श्वास घेण्यासारखे महत्त्वाचे आहे’ असे मधुमती म्हणायच्या. त्यांच्या नृत्याच्या लयबद्धतेमुळं आणि भावनाप्रधान सादरीकरणामुळं त्यांनी प्रेक्षकांच्या मनात लवकरच घर केले. मधुमती यांनी हिंदी, मराठी, पंजाबी, भोजपुरी तसेच दक्षिण भारतीय भाषांमधील 100 पेक्षा जास्त चित्रपटात काम केलं. आंखे, टॉवर हाऊस, शिकारी आणि मुझे जीने दो यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्या झळकल्या होत्या. याशिवाय त्यांनी अनेक हिट गाण्यांमध्ये आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांची मनं जिंकली.

वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत
ज्येष्ठ अभिनेत्री मधुमती या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिल्या. कारण वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी स्वतःपेक्षा वयाने मोठे आणि चार मुलांचे वडील असलेल्या दीपक मनोहर यांच्याशी लग्न केलं. मधुमती यांच्या आईला हे नातं मान्य नव्हते. मात्र तरीही मधुमती यांनी पतीसह राहण्याचा निर्णय घेतला.

त्या काळात मधुमती यांची तुलना कायम हेलन यांच्याशी केली जायची. पण एका मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या की, ‘आम्ही दोघी मैत्रिणी होतो, शिवाय त्या माझ्या सिनियर आहेत. आमची तुलना केली जात असली तरी आम्हाला त्याचा कधी फरक पडला नाही’. अभिनेत्री मधुमती यांनी पतीच्या निधनानंतर डान्स अकॅडमी उघडली आणि त्यांनी अनेकांना नृत्य शिकवलं. ज्यामध्ये अक्षय कुमार, तब्बू आणि बिंदू दारा सिंग यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश होता. मधुमती 1980 मध्ये ‘सावली प्रेमाची’ या मराठी चित्रपटात देखील झळकल्या होत्या.

हेही वाचा – मराठी आडनावांच्या मागे ‘कर’ का लावला जातो? 90% टक्के लोकांना माहित नसेल

Comments are closed.