अध्यक्ष होताच गांगुलींकडून क्रिकेटप्रेमींना गिफ्ट! IND-SA सामन्याची तिकिटं आता स्वस्त दरात!
भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, जिथे 3 वनडे सामन्यांच्या मालिकेनंतर 5 टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या दौऱ्यानंतर भारतीय संघ घरी परतल्यावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिन्ही फॉरमॅट्समध्ये मालिका खेळणार आहे. या मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल, तर पहिला कसोटी सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्याच्या तयारीला बंगाल क्रिकेट असोसिएशनने सुरुवात केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या सामन्यापूर्वीच क्रिकेट चाहत्यांना एक मोठे दिवाळी गिफ्ट दिले आहे.
कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर तब्बल 6 वर्षांनंतर पुन्हा एकदा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. येथे शेवटचा कसोटी सामना 2019 साली भारत आणि बांग्लादेश यांच्यात पिंक बॉल टेस्ट म्हणून झाला होता. आता 14 नोव्हेंबरपासून ईडन गार्डन्सवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्याची तिकिटे झोमॅटो अॅपवरून बुक करता येतील. 5 दिवसांच्या सामन्यासाठी तिकिटाची किंमत 300 रुपये ठेवण्यात आली आहे, म्हणजे एका दिवसाच्या खेळासाठी फक्त 60 रुपये पडतील. याशिवाय एका दिवसासाठी 250 रुपयांचं तिकिटाचे पर्यायही उपलब्ध आहे.
रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर शुबमन गिल सध्या कसोटी आणि वनडे संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या कर्णधारपदाखाली भारताने पहिली कसोटी मालिका इंग्लंडमध्ये खेळली होती, जी 2-2 अशी बरोबरीत संपली. त्यानंतर भारताने घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजचा 2-0 असा पराभव केला होता. आता गिलच्या कर्णधारपदाखाली भारत पहिली वनडे मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळत आहे, ज्यामध्ये भारताला पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे.
सौरव गांगुली यांनी 22 सप्टेंबर 2025 रोजी दुसऱ्यांदा बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. याआधी ते 2015 ते 2019 या कालावधीत या पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी हे पद सोडून बीसीसीआयचे 35 वे अध्यक्षपद स्वीकारले होते.
14 ते 18 नोव्हेंबरदरम्यान पहिल्या कसोटीनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरी कसोटी 22 ते 26 नोव्हेंबरदरम्यान असम क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळली जाईल. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 30 नोव्हेंबरपासून आणि पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला 9 डिसेंबरपासून सुरुवात होईल.
Comments are closed.