खळबळजनक! आईच्या शोधात घराबाहेर पडलेल्या चिमुकलीचा मोकाट कुत्र्यांनी घेतला बळी

जालना शहरात आज २० ऑक्टोंबर रोजी सकाळी हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. सोलार अभियंता असलेले दीपक गोस्वामी हे बिहार राज्यातुन पोट भरण्यासाठी आलेले. ते आपली पत्नी, दोन मुलींसह जालना शहरातील यशवंत नगरात बारगजे यांच्याकडे भाड्याने घर घेऊन राहायचे. रात्री त्यांची पत्नी आणि त्यांच्यात दिवाळीनिमित्त गावी बिहारला जाण्यावरुन वाद झाला. दीपक गोस्वामी म्हणत होते, छटपूजेला जाऊ तर पत्नीचा दिवाळीला जाण्याचा आग्रह होता. रात्री गोस्वामी यांची पत्नी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांनी तिला व मोठ्या ७ वर्षाच्या मुलीला रेल्वे स्थानकात येऊन रेल्वेत बसवून दिले. मात्र, लहान मुलगी परी (३ वर्षे, ३ महिने) हिने आईसोबत न जाता वडिलांसोबत परत घरी आली. रात्री वडिलांसोबत झोपलेल्या परीला आईची आठवण आली आणि पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास ती घराचे दार उघडून आईच्या शोधात बाहेर पडली.
मात्र, बाहेर असलेल्या मोकाट कुत्र्यांच्या झुंडीने एकट्या परीला घेरले आणि तिचे लचके तोडत शेजारी असलेल्या मोकळ्या प्लॉटवर नेले. परी किंचाळत असतांना परिसरातील कोणालाही जाग आली नाही. अक्षरशः तिचे अंगांचे लचके तोडत तिचे अनेक अवयव कुत्र्यांनी फस्त केले. आज सकाळी मॉर्निंग वॉकवरून घरी परत येणारे पोलीस कर्मचारी मदन बहुरे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्या रक्तपिपासू कुत्र्यांना हाकलून लावत पोलिसांना खबर दिली. तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चिमुकल्या परीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे. जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रचंड हैदोस माजला असून, त्यांनी अनेक लहान बालकांना आपले शिकार बनविले आहे. यात अनेक बालके गंभीर जखमी झाले आहेत तर काहींचा बळी गेला आहे. एवढे होऊन जालना महापालिकेचे प्रशासन मात्र मोकाट कुत्र्यावर थेट कारवाई न करता झोपेचे सोंग घेत आहे.
Comments are closed.