‘जर वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर….' नवज्योत सिंग सिद्धू यांनी केले वादग्रस्त विधान
भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज फलंदाज आणि सध्या प्रसिद्ध क्रिकेट समालोचक नवजोत सिंह सिद्धू यांचा एक सोशल मीडिया पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, जर भारताला 2027 चा वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर बीसीसीआयने तात्काळ गौतम गंभीर आणि अजीत आगरकर यांना त्यांच्या पदावरून हटवायला हवे. तसेच पूर्ण सन्मानाने रोहित शर्माला पुन्हा एकदा कर्णधारपद द्यायला हवे. या पोस्टनंतर सिद्धूंवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मात्र प्रश्न असा आहे की, खरंच नवजोत सिंह सिद्धूंनी असे काही म्हटले आहे का?
नवजोत सिंह सिद्धूंनी स्वतःच या व्हायरल पोस्टचे सत्य स्पष्ट केले आहे. सिद्धूंनी सोशल मीडियावर लिहिले आहे, “लाज वाटली पाहिजे. मी असे कधीच म्हटले नाही. खोट्या बातम्या पसरवू नका. अशी कल्पनाही करता येणार नाही.” यावरून हे स्पष्ट होते की व्हायरल झालेली पोस्ट पूर्णपणे खोटी आहे. एआयच्या युगात अनेकदा माजी क्रिकेटपटूंच्या नावाने चुकीच्या आणि बनावट पोस्ट्स व्हायरल होत असतात. यावेळीही असेच काही घडले आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी 26 वर्षीय शुबमन गिल याची भारताच्या वनडे संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्याला कसोटी संघाची धुरा सोपवण्यात आली होती. इंग्लंड दौर्यात गिल कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या जबाबदारीत यशस्वी ठरला होता. मात्र, वनडे सामन्यात कर्णधार म्हणून गिलला पहिला सामना जिंकता आला नाही. याआधी वनडे संघाची कमान रोहित शर्माच्या हातात होती. रोहितने याच वर्षी भारताला 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली होती, पण त्यांच्या वयाचा विचार करून आता कर्णधारपद शुबमन गिलकडे सोपवण्यात आलं आहे.
Comments are closed.