शिवरायांचे किल्ले, दशावतार आणि गजर महाराष्ट्राचा! प्रभादेवी दीपोत्सवात वैभवशाली परंपरेचे दर्शन

यंदाच्या दिवाळीत प्रभादेवी परिसर अनोख्या सांस्कृतिक जल्लोषाने भारून गेला. शिवरायांचे गडकिल्ले, दशावतार आणि पारंपरिक खेळ यातून महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि वैभवशाली परंपरा यांचे दर्शन घडले. निमित्त होते पहिल्या ‘प्रभादेवी दीपोत्सव 2025’ चे! शिवाज्ञा फाउंडेशनने आयोजित केलेल्या दीपोत्सवाला रहिवाशांचा दमदार प्रतिसाद लाभला.
‘प्रभादेवी दीपोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन 17 ते 19 ऑक्टोबर दरम्यान कै. राजाभाऊ साळवी उद्यान येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार महेश सावंत यांच्या हस्ते झाले. शिवसेना नेते खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे यांनी कार्यक्रमाला भेट दिली.
दीपोत्सव कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे भव्य प्रदर्शन. या किल्ल्यांचा नुकताच युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला आहे. हे प्रदर्शन शार्पकटर मिनीएचर स्टुडियो यांनी साकारले होते. किल्ल्यांची नाजूक मिनिएचर कलाकृती पाहून प्रेक्षक थक्क झाले. दीपोत्सवात दररोज वेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण रंगून गेले. पहिल्या दिवशी पारंपरिक दशावतार नाट्यप्रयोग, दुसऱ्या दिवशी खेळ फुगड्यांचा, तर तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या वैभवाचा जल्लोष करणारा ‘गजर महाराष्ट्राचा’ हा सांस्कृतिक सोहळा सादर करण्यात आला. याशिवाय रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, दिवाळी फराळ पाककला स्पर्धा, कॅलिग्राफी कार्यशाळा आणि भव्य नृत्यस्पर्धा अशा विविध उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
शिवाज्ञा फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष अभिषेक पाताडे म्हणाले, ‘प्रभादेवी दीपोत्सवाच्या माध्यमातून या भागातील लोकांसाठी स्वतःचे सांस्कृतिक व्यासपीठ निर्माण करायचा आमचा प्रयत्न आहे. यावर्षी हा उपक्रम पहिल्यांदाच साकारला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यापुढे दरवर्षी अधिक मोठ्या स्वरूपात दीपोत्सव आयोजित करून ही परंपरा पुढे नेण्याचा संकल्प आहे.’ कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी नूतन पाताडे, प्रणित खाडपे, साईश माने, प्रियांका सर्वे आणि विनोद कदम यांनी मेहनत घेतली.
Comments are closed.