पाच दशके, तीनशेहून अधिक चित्रपट गाजवले

ज्येष्ठ अभिनेते असरानी यांनी चित्रपटसृष्टीतील पाच दशकांच्या करिअरमध्ये तब्बल तीनशेहून अधिक हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले. भूमिका लहान असो वा मोठी, त्यांनी प्रत्येक भूमिकेला न्याय दिला. विनोदाचा हुकमी एक्का अशी त्यांची ओळख असली तरी अनेक चित्रपटांत त्यांनी चरित्र भूमिका तितक्याच ताकदीने वठवल्या.

असरानी यांचे पूर्ण नाव गोवर्धन असरानी. त्यांचा जन्म जयपूर येथे झाला. जयपूरमधील ऑल इंडिया रेडिओमध्ये त्यांनी काम केले आणि त्यानंतर पुण्यातील फिल्म इन्स्टिटय़ूटमध्ये प्रवेश घेतला. 1967 साली हरे कांच की चुडिया या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. असरानी यांच्या पत्नी  मंजू बन्सल या सुद्धा अभिनेत्री आहेत. आज की ताजा खबर, नमक हराम या चित्रपटात एकत्र काम करतेवेळी त्यांच्यात प्रेम झाले. पुढे ते लग्नबंधनात अडकले. तपस्या, चांदी सोना, जान-ए-बहार, जुर्माना, नालायक, सरकारी मेहमान, चोर सिपाही या चित्रपटांमध्ये ही जोडी एकत्र झळकली. असरानी यांनी ‘हम नहीं सुधरेंगे’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्यातही त्यांनी एकत्र काम केले होते.

गाजलेले चित्रपट

1970 ते 1980 हे दशक त्यांच्या कारकिर्दीचे शिखर होते. त्यांनी या काळात शंभरहून अधिक चित्रपट केले. राजेश खन्ना यांच्यासोबत त्यांनी बावर्ची, घर परिवार अशा तब्बल 25 चित्रपटांमध्ये काम केले. सत्यकाम, गुड्डी, अभिमान, चुपके चुपके, पती पत्नी और वो, द बार्ंनग ट्रेन, तकदीरवाला, बडे मिया छोटे मिया हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. 2000 सालानंतर आलेल्या हेराफेरी, हलचल, चुप चुप के, धमाल, भुलभुलैया, मालामाल विकली, गरम मसाला, दे दनादन, बोल बच्चन, भागम भाग या चित्रपटातील त्यांच्या भूमिकाही प्रचंड गाजल्या. फॅमिली 420 या मराठी चित्रपटांतही त्यांची अभिनयाची जादू पाहायला मिळाली.

Comments are closed.